रेल्वेतून नदीत पडलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

संदीप घिसे
सोमवार, 19 मार्च 2018

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेचा नदीत पडून मृत्यू झाला. या महिलेचा मृतदेह सोमवारी दुपारी अग्निशामक दलाच्या हाती लागला.

पिंपरी - पिंपरी ते खडकी असा रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेचा नदीत पडून मृत्यू झाला. ही घटना दापोडी येथे रविवारी रात्री घडली. या महिलेचा मृतदेह सोमवारी दुपारी अग्निशामक दलाच्या हाती लागला. शीतल सुमीत लोहटे (वय 28, रा. पडाळ वस्ती, आंबेडकर नगर, खडकी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिस उपनिरीक्षक मदन कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास शीतल या आपल्या बहिणीकडून पिंपरीतून खडकी येथे येण्यासाठी रेल्वेने निघाल्या होत्या. दापोडी ब्रिजवर आल्यावर त्या रेल्वेतून खाली पडल्या. याबाबत एका नागरिकाने पोलिसांना माहिती दिली. तसेच त्या रेल्वेच्या डब्यात असलेल्या एका महिलेने शीतल यांची बॅग खडकी रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केली. रविवारी रात्री शीतल यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र त्यात यश आले नाही. सोमवारी पुन्हा त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाने सुरू केला. दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास शीतल यांच्या मृतदेह पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या हाती लागला. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक कानडे, विवेक खांदेवाड, भूषण येवले, अमोल चिपळूणकर, निलेश वरखडे, व प्रदीप हिले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

अग्निशमन दलातही हद्दीचा वाद
नदीपात्रात पडलेला मृतदेह नेमका कोणाच्या हद्दीत आहे? यावरून पुणे अग्निशामक दल आणि पिंपरी चिंचवड अग्निशामक दल यांच्यात सोमवारी वाद सुरू होता. मात्र पोलिसांनी दोन्ही अग्निशामक दलात मृतदेह शोधण्याचे फर्मान सोडले त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत पिंपरी चिंचवड अग्निशामक दलास मृतदेह शोधण्यात यश आले.

Web Title: The body of a woman were found in the river pimpari pune