धबधब्याच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह दोन दिवसांनंतर लागला हाती 

धबधब्याच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह दोन दिवसांनंतर लागला हाती 

शिरूर : पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण परिसरातील रूईचोंडा धबधब्याच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या येथील महाविद्यालयीन युवकाचा मृतदेह दोन दिवसांनंतर हाती लागला. ऐन सणासुदीत घडलेल्या या घटनेने येथील कुंभार आळी परिसरावर शोककळा पसरली.

पुणे

श्रेयश नवनीत जामदार (वय १८, रा. कुंभार आळी, शिरूर) असे धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. सोशल मिडीयावरून रूईचोंडा धबधबा व तेथील निसर्ग सौंदर्याबाबत माहिती समजल्याने श्रेयश हा त्याच्या मित्रांसमवेत, एन दस-याच्या दिवशी (ता. २५) धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेला होता. धबधब्याजवळ व परिसरात फोटो काढल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास धबधब्याखाली आंघोळ करण्याचा मोह झाल्याने सर्व मित्रांनी आंघोळ केली. मात्र, त्याचदरम्यान, श्रेयशचा पाय घसरून तो धबधब्याखालील एका खोल खड्ड्यात गेला.

मित्रांनी बराच वेळ शोध घेतला मात्र, पाण्यातच बेपत्ता झालेल्या श्रेयशचा शोध लागला नाही. स्थानिकांच्या मदतीनेही मित्रांनी त्याचा शोध घेतला, मात्र धबधबा परिसरातील धोकादायक खड्डे व रांजणखळग्यांमुळे तो सापडू शकला नाही. दरम्यान, पारनेर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन तपास केला. धबधबा परिसरात दोरीची जाळी लावली. तरीही त्याचा ठावठिकाणा लागू शकला नाही.

स्थानिकांच्या माहितीनूसार धबधब्याखाली व आतील बाजूस मोठे खड्डे असून, तेथे पाण्याचा प्रवाहही वेगवान असतो. त्यामुळे गेले दोन दिवस श्रेयशचे कुटूंबीय व नातेवाईक हताशपणे धबधबा परिसरात फिरून शोध घेत होते. दरम्यान, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास धबधब्यापासून थोड्या अंतरावर पाण्याच्या प्रवाहाकडेला श्रेयशचा मृतदेह आढळून आला. रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढल्यानंतर, शिरूर येथे शोकाकूल कुटूंबियांनी अंत्यसंस्कार केले. श्रेयश हा आई - वडीलांचा एकूलता एक मुलगा होता. वीटभट्टीवर काम करून तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पारनेर तालुक्यातील रूईचौंडा धबधबा हा मांडओहोळ धरणाच्या परिसरात असून, धरण व धबधबा परिसरात पर्यटकांची कायम गर्दी असते. सोशल मिडीयावर टाकल्या जाणा-या व्हिडिओंमुळे पर्यटक व विशेषतः तरूण आकर्षित होऊन धबधब्याकडे धाव घेत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. साठ फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा निसर्गसौंदर्याचा एक अनोखा नजराणा असला; तरी परिसर खड्ड्यांचा असल्याने धोकादायक आहे. धबधब्यातील पाणी जोरात कोसळत असल्याने त्याखाली व डोंगराच्या आतल्या बाजूला रांजणखळगे तयार झाले आहेत. ते अत्यंत घातक आहेत. गेल्या महिन्यातही पाथर्डी तालुक्यातील पोलिस कर्मचारी गणेश दहिफळे यांचाही या धबधब्यात बुडून मृत्यु झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com