पुण्यातील इंजिनिअरिंगच्या तरुणीला फास्ट बाईक चालवणं पडलं महागात!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

सदर विद्यार्थीनी ही हुशार असून तिची शैक्षणिक पार्श्वभूमीदेखील चांगली आहे. सदर गुणवत्ताधारक विद्यार्थीनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे.

पुणे : पुण्यातील १९ वर्षीय इंजिनीअरिंगच्या विद्यार्थीनीविरोधातील  एफआयआर मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. सदर विद्यार्थीनीने जाणूनबुजून वाहतुकीच्या नियमांचा भंग केला, हे दर्शविण्यासाठी रेकॉर्डवर काहीही नाही, असं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं. पण सदर विद्यार्थीनीला दहा हजार रुपये दंडही आकारण्यात आला. 

जानेवारी २०१९मध्ये रॅश ड्रायव्हिंग केल्याबद्दल सदर विद्यार्थीनीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. एफआयआर रद्द करतानाच तिला दंड आकारण्यात आला. 'वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे,' हे लक्षात आणून देत तिला दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

 'मुलाला वाचवायचं असेल तर ५ लाख द्या'; खुनाची धमकी देत महिला डॉक्‍टरकडे मागितली खंडणी

न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. ६ जानेवारी २०१९ रोजी कलम २७९ (सार्वजनिक रस्त्यावरून रॅश ड्रायव्हिंग करणे) अंतर्गत पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्यात विद्यार्थीनीविरोधात तक्रार नोंदवत सदर विद्यार्थीनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. विद्यार्थीनीविरोधातील या रिट याचिकेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. 

याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वकील आर.डी.सोनी आणि सुजय गावडे यांनी युक्तिवादात असे म्हटले आहे की, 'सदर विद्यार्थीनी ही हुशार असून तिची शैक्षणिक पार्श्वभूमीदेखील चांगली आहे. सदर गुणवत्ताधारक विद्यार्थीनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. ६ जानेवारी २०१९रोजी ती महाविद्यालयात प्रकल्पानिमित्त जात होती. त्यामुळे महाविद्यालयात जाताना तिने आपल्या वाहनाचा वेग वाढवला असावा.' 

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?​

वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे खंडपीठाने यावेळी नमूद केले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सदर विद्यार्थीनी १९ वर्षांची होती आणि गुणवत्ताधारक विद्यार्थीनीविरोधात फौजदारी कारवाई करणे, हे न्यायाच्या हिताचे होणार नाही. तसेच जाणूनबुजून तिने वाहतुकीच्या नियमांचा भंग केला, हे दर्शविण्यासाठी ठोस असे काहीच नाही. सदर विद्यार्थीनीकडून ही पहिली चूक झाली आहे, त्यामुळे हे प्रकरण रद्दबातल करण्यात येत आहे, असे खंडपीठाने नमूद केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bombay HC quashes FIR against Pune student booked for rash driving