पुणेकरांसाठी कर्जरोखे महागच

ज्ञानेश सावंत 
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पुणे - केंद्र आणि राज्य सरकारांकडून पाठ थोपटून घेत महापालिका प्रशासनाने समान पाणीपुरवठा योजनेसाठी दोनशे कोटींचे कर्जरोखे घेतले; मात्र महापालिकेच्या तिजोरीत आठ महिने पडून असलेल्या कर्जरोख्यांच्या व्याजाचे सुमारे पावणेआठ कोटी रुपये महापालिकेने मोजले आहेत. एवढे व्याज भरल्यानंतर जागे झालेल्या महापालिकेने कर्जरोख्यांची रक्कम बॅंकेत ठेवली असली, तरी तिच्या व्याजापोटी महापालिकेला सहा कोटी रुपये मिळणार आहेत. महापालिकेला मिळणारे व्याज आणि कर्जारोख्यांचे भरावे लागणारे व्याज यामध्ये दीड ते पावणेदोन कोटींची तफावत असल्याने कर्जरोखे पुणेकरांसाठी महागात पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पुणेकरांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांच्या योजनेसाठी वित्तीय संस्थांकडून कर्जरोखे घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार २ हजार २६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय नगर विकासमंत्री वेंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत मुंबईत कर्जरोख्यांची घोषणा करत महापालिका प्रशासनाने कर्जरोख्यांचा प्रचंड गाजावाजा केला. मंजूर कर्जरोख्यांपैकी दोनशे कोटी रुपये जूनमध्ये महापालिकेला मिळाले.

दरम्यान, निविदांमधील गैरव्यवहारामुळे योजना रखडली. त्यामुळे हे दोनशे कोटी रुपये आठ महिन्यांपासून पडून होते. दुसरीकडे मात्र निविदांमधील गोंधळ वाढत होता. या पार्श्‍वभूमीवर कर्जरोखे घेण्यासाठी घाई केल्याची टीका सर्वच स्तरांतून झाली. कर्जरोख्यांची रक्कम पडून असल्याने त्याच्या व्याजाचा भुर्दंड पुणेकरांच्या माथी मारला जाण्याची टीका झाली. त्यामुळे महापालिकेने फेब्रुवारीमध्ये दोनशे कोटी रुपये राष्ट्रीयीकृत बॅंकेत सहा महिन्यांच्या मुदतीसाठी ठेवले आहेत. त्याचा व्याजदर ६.७५ इतका असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

कर्जरोख्यांची रक्कम कमी
योजनेसाठी २ हजार २६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्यात येणार होते; मात्र निविदांमधील गैरव्यवहार उघडकीस आल्याने योजनेचा मूळ खर्च ३ हजार ३०० कोटींहून आता २००० कोटी इतका झाला आहे. त्यामुळे आता एवढ्या प्रमाणात कर्जरोख्यांची आवश्‍यकता राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी कर्जरोख्यांची रक्कम कमी होईल, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे; परंतु त्याबाबत कार्यवाही झाली नसल्याचे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

जास्त व्याजाची रक्कम कमी व्याजाने
महापालिकेने ज्या बॅंकेत दोनशे कोटी रुपये ठेवले आहेत, त्यातून महापालिकेला सहा महिन्यांचे व्याज सहा कोटी रुपयांच्या आसपास मिळण्याची शक्‍यता आहे; मात्र त्याचा नेमका आकडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही ठाऊक नाही. दुसरीकडे मात्र कर्जरोख्यांच्या व्याजापोटी महापालिकेने पहिल्या सहा महिन्यांचे ७ कोटी ६१ लाख रुपये मोजले आहेत. त्यामुळे जादा व्याजाची रक्कम कमी व्याजदराने दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जरोख्यांच्या व्याजाचा दुसरा हप्ता येत्या जूनमध्ये भरावा लागणार आहे.

कर्जरोखे आणि राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या व्याजदरात फरक आहे. महापालिकेने दोनशे कोटी रुपये तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे, ठराविक मुदतीसाठी बॅंकेत ठेवले आहेत. त्यामुळे त्यांचे व्याज कमी आहे. मुळात योजनेचे काम सुरू न झाल्याने ही रक्कम बॅंकेत ठेवावी लागली, त्याचा फायदा झाला आहे.
- कुणाल मंडवाले, प्रभारी मुख्य वित्तलेखा अधिकारी, महापालिका

Web Title: Bond debt rate