दृष्टिहीनांसाठी ‘डोळस’ प्रयोग

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन पुस्तकांबरोबरच साहित्यातील पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध व्हावीत, यासाठी स्वतः दृष्टिहीन असलेले अभियंता विकास पोतदार आणि अभियांत्रिकीचा विद्यार्थी अनिकेत बिरारी यांनी प्रयत्न सुरू केला आहे.

पुणे - देशातील दृष्टिहीनांच्या एकूण शाळांपैकी फक्त ६.८६ टक्के शाळांमध्ये ब्रेल लिपीतील पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच, शासनाच्या वतीने फक्त पहिली ते दहावीच्या पाठ्यक्रमाची पुस्तके ब्रेल लिपीत छापण्यात येतात. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन पुस्तकांबरोबरच साहित्यातील पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध व्हावीत, यासाठी स्वतः दृष्टिहीन असलेले अभियंता विकास पोतदार आणि अभियांत्रिकीचा विद्यार्थी अनिकेत बिरारी यांनी प्रयत्न सुरू केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मूळचे मालेगावचे (नाशिक) असलेले पोतदार हे अंध शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी राज्यात दिव्यांगांसाठी १२ प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पातील विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करण्यासाठी ब्रेल प्रिंटरची त्यांना आवश्‍यकता आहे. शैक्षणिक साहित्याबरोबरच आध्यात्मिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या पुस्तकांचे ग्रंथालय उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी ३ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ब्रेल प्रिंटरबरोबरच कागदासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्‍यकता आहे.

या बँक खात्यावर पाठवा मदत
 स्टेट बॅंक ऑफ इंडिया (शाखा ः मालेगाव, नाशिक)
 खाते क्रमांक ः ३०५२९५९६२८१  आयएफएससी ः SBIN००००४१८

शालेय पुस्तकांबरोबरच गीता, महाभारत, रामायण यांसारख्या धार्मिक पुस्तकांबरोबरच, हक्क नसलेली साहित्यातील पुस्तकांची छपाई ब्रेल लिपीत आम्ही करणार आहोत. ही पुस्तके अंध शाळांना भेट स्वरूपात देण्यात येतील. 
- अनिकेत बिरारी, अभियांत्रिकीचा विद्यार्थी 

आणखी वाचा - निकालापूर्वीच भाजपनं मान्य केला पराभव

सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे दृष्टिहीन विद्यार्थ्यांनाही साहित्यातील पुस्तके वाचण्याची आवड असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते महत्त्वाचे आहे. पण, राज्यात ब्रेल प्रिंटरची संख्या फार कमी आहे. ब्रेल प्रिंटरच्या मदतीने राज्यातील अंध शाळांतील पुस्तकांची गरज भागविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- विकास पोतदार, अभियंता  

आकडेवारी
 एनसीईआरटीच्या आकडेवारीनुसार सध्या देशात २ कोटी २० लाख दृष्टिहीन
 दृष्टिहीनांच्या लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर
 दृष्टिहीनांच्या एकूण लोकसंख्येच्या २९.१६ टक्के लोक शिक्षण घेतात
 देशात फक्त वरळी (मुंबई) आणि डेहराडून (उत्तराखंड) येथे ब्रेल प्रिंटर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Books available for blind students