'सर्वांना जोडण्याची श्रद्धा म्हणजे हिंदुत्व'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे - ‘‘हिंदुत्वाची व्याख्या अनेकप्रकारे केली जाते; पण हिंदुत्व एकच आहे. स्वतःवर आणि मानवतेवर विश्‍वास ठेवणे आणि सर्वांना जोडण्याची श्रद्धा म्हणजेच हिंदुत्व आहे,’’ असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे व्यक्त केले. 

पुणे - ‘‘हिंदुत्वाची व्याख्या अनेकप्रकारे केली जाते; पण हिंदुत्व एकच आहे. स्वतःवर आणि मानवतेवर विश्‍वास ठेवणे आणि सर्वांना जोडण्याची श्रद्धा म्हणजेच हिंदुत्व आहे,’’ असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे व्यक्त केले. 

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव आणि लेखक डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी लिहिलेल्या, तसेच अनुवाद केलेल्या ‘माती, पंख नि आकाश’, ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’, ‘शांती की अफवांए’, ‘होतच नाही सकाळ’,  ‘ज्ञानेश्‍वर मुळे की कविताए ः प्रातिनिधिक संकलन’ या पुस्तकांचे प्रकाशन रविवारी भागवत यांच्या हस्ते झाले. मुळे यांच्यासह आंतरराष्ट्रीय धोरण विश्‍लेषक व ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’चे अध्यक्ष संदीप वासलेकर उपस्थित होते. 

‘‘संघ असेल किंवा काँग्रेस, या दोन्ही संघटना शंभर - दीडशे वर्षे जुन्या आहेत. अनेकांनी त्यासाठी कष्ट घेतले आहेत. संघाचे टीकाकार म्हणतात ‘संघमुक्त भारत’ पाहिजे, तर काँग्रेस विरोधक म्हणतात, ‘काँग्रेसमुक्त भारत’ पाहिजे. काही लोकांना ‘मुक्त’विषयी बोलणे सोपे आहे; पण आपल्याला कशाने ‘युक्त’ भारत पाहिजे याचा विचार केला पाहिजे,’’ असे मत वासलेकर यांनी व्यक्त केले. या मुद्द्यांचा उल्लेख भागवत यांनी त्यांच्या भाषणात केला. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रबांधणीचे काम हे कोणा एका थोर पुरुषाच्या कर्तृत्वाचे फळ असे नसते. जे राष्ट्र तयार होते ते काम करणाऱ्यांची, न करणाऱ्यांची, काम करणाऱ्यांना खाली खेचणाऱ्यांच्या अशा सगळ्यांच्या कामाची गोळाबेरीज असते. संघटन करताना सर्वांना सोबत घेऊन जावे लागते. त्यासाठी सर्वांचे विचार जुळायची काही आवश्‍यकता नसते.’’ सूत्रसंचालन उज्ज्वला बर्वे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी  सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी आभार मानले. 

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी एक वर्षापूर्वी प्रत्यक्ष परिचय झाला. भागवत यांची विशिष्ट प्रतिमा आहे. त्यांना प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. त्यांच्या विशिष्ट प्रतिमेपलीकडचे मोहनजी काय आहेत, हे जाणून घेण्याची इच्छा होती. म्हणून त्यांना हिंदू-मुस्लिम ऐक्‍य, विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी अशा विविध विषयांवर प्रश्‍न विचारले. त्यांची उत्तरे ऐकून असे लक्षात आले, की एकाअर्थाने खरे मोहन भागवत हे जनतेला कळलेच नाहीत. म्हणून माझ्या कार्यक्रमाला येण्याचे त्यांना आमंत्रण दिले, जेणेकरून माझ्या चाहत्या युवावर्गाला त्यांचे विचार ऐकायला मिळतील.
- डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे, सचिव, भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

Web Title: Books Publishing mohan bhagwat pune