स्थलांतर लांबल्याने पुलाचे काम रखडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पिंपरी - हॅरिस पुलालगतच्या झोपडपट्टीचे स्थलांतर करण्यास पुणे महापालिकेने सुरवात केली आहे. हे स्थलांतर लांबल्यामुळे पुण्याकडून पिंपरीकडे जाणाऱ्या पुलाचे काम रखडले आहे. झोपडपट्टीच्या जागी एक खांब उभारून, त्यावर स्लॅब टाकण्यात येईल. तेथे रॅम्प बांधल्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू होईल. पावसाळ्यानंतर हे काम होणार असल्यामुळे या नवीन पुलावरील वाहतूक डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्‍यता आहे.

हॅरिस पुलाला दोन्ही बाजूला समांतर पूल उभारण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला. त्याचा निम्मा-निम्मा खर्च दोन्ही महापालिका करणार आहेत. त्यावेळी या पुलामध्ये असलेल्या झोपडपट्टीचे स्थलांतर करण्याचा निर्णय झाला. मात्र, त्या प्रक्रियेला दोन वर्षे लागली. पूल बांधण्याची मुदत मे महिन्यात संपणार असल्याने, जादा होणारा दोन कोटी रुपयांचा खर्च पुणे महापालिकेने करावा, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या महिन्यात केली. त्यानंतर पुणे महापालिकेने तातडीने हालचाली करीत झोपडपट्टीचे स्थलांतर सुरू केले. त्या झोपडपट्टीवासीयांना अन्य ठिकाणी इमारतींमध्ये जागा देण्यात आली आहे.

मुळा नदीपात्रातील उभारलेल्या पुलाच्या खांबावर स्लॅब टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. ते काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होईल. मात्र, राहिलेला एक खांब उभारल्यानंतर नदीपात्रातून त्या खांबावर स्लॅब टाकता येणार नाही. तसेच रॅम्प करताना पावसाची अडचण येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतरच ही कामे करण्यात येतील.

पावसाळ्यानंतर पुण्याकडून पिंपरीकडे येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण करण्यात येईल. पिंपरीकडून पुण्याकडे जाणारा पूल येत्या पंधरवड्यात सुरू होईल. त्यामुळे या भागातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या दूर होईल, असे सह शहर अभियंता राजन पाटील यांनी सांगितले.

हॅरिस पुलाजवळील झोपडपट्टीच्या स्थलांतराचे काम सुरू केले आहे. पावणेदोनशे नागरिकांचे स्थलांतर केले. उर्वरित ५० ते ६० घरांचे स्थलांतर करण्यात येईल. सुनावणीचे काम पूर्ण झाले आहे. महिनाभरात हा प्रश्‍न मार्गी लागेल. 
- संदीप कदम, क्षेत्रीय अधिकारी, औध क्षेत्रीय कार्यालय.

Web Title: bopodi haris bridge work slum migration