esakal | हप्ते थकल्यास होणाऱ्या दादागिरीने कर्जदार हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

फायनान्स कंपन्यांच्या ‘गुंडां’चा जाच

फायनान्स कंपन्यांच्या ‘गुंडां’चा जाच

sakal_logo
By
पांडूरंग सरोदे

पुणे : गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. पुन्हा लॉकडाउन लागल्याने कर्जाचे काही हफ्ते थकले. त्यानंतर संबंधीत फायनान्स कंपनीने नेमलेल्या रिकव्हरी एजन्सीच्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती घरी येऊ लागल्या. शिवीगाळ, धमकाविण्यापासून ते जीवे मारण्याची धमकी ते देतात. त्यांना पोलिसांचा धाक नाही. त्यांच्याकडून मला व कुटुंबाच्या जिवाला धोका आहे, पण न्याय कुठे मिळेल ? काही फायनान्स कंपन्या, त्यांच्या रिकव्हरी एजन्सीच्या दादागिरीचा अन्याय सहन करणाऱ्या एका कर्जबाजारी नागरिकांची ही प्रतिक्रिया. याच पद्धतीने अनेक नागरिकांना सध्या याचा सामना करावा लागतो.

मुलांचे शिक्षण, घर बांधणी, सदनिका किंवा वाहन खरेदी, कुटुंबीयांचे आजारपण, व्यवसाय अशा वेगवेगळ्या कारणांसाठी नागरिकांकडून एखादी वित्तीय संस्था, खासगी सावकार किंवा पतसंस्थेकडून झटपट कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यांना काही दिवसांतच कर्ज मिळते. कर्जाचा हफ्ता वेळेत जाईपर्यंत नागरिकांना अडचण येत नाही. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे कर्जाचे हफ्ते थकण्यास सुरवात झाल्यानंतर संबंधित फायनान्स कंपन्या, त्यांच्या रिकव्हरी एजन्सीकडून नागरिकांशी संपर्क साधण्यास सुरवात करतात. प्रारंभी फोनवरून नागरिकांशी उद्धटपणे व अर्वाच्य भाषेत बोलण्यापासून ते त्यांना शिवीगाळ करण्यापर्यंत संबंधित व्यक्तींची मजल जाते. केवळ तेवढ्यावरच न थांबता कर्जदाराच्या घरी जाऊन, त्यांच्या शेजाऱ्यांसमोर त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली जाते. या सगळ्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त आहेत.

हेही वाचा: शरद पवारांच्या 'ती लहान माणसं' वक्तव्यावर पटोलेंची प्रतिक्रिया

एकीकडे कोरोनाच्या परिस्थितीमुळे नागरिकांच्या हातचे रोजगार, व्यवसाय गेले आहेत. त्यामुळे नागरिक अगोदरच हतबल झाले आहेत. अनेकांना कुटुंबांचा दैनंदिन खर्च भागवणेही अवघड होत आहेत. अशातच रिकव्हरी एजन्सीच्या लोकांकडून दररोज होणाऱ्या त्रासामुळे नागरिक कंटाळले आहेत. स्वतःसह कुटुंबाच्या जिवाला धोका असल्यामुळे पोलिसांकडेही जाण्यास ते धजावत नाहीत. त्यामुळे फायनान्स कंपन्या, रिकव्हरी एजन्सीचा जाच सहन करण्याशिवाय अनेकांना पर्याय नसल्याची सद्यःस्थिती आहे.

हेही वाचा: एकाचवेळी दोन व्हेरियंटचा संसर्ग; पाच दिवसांत रुग्णाचा मृत्यू

उदाहरण क्रमांक २ ः खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेल्या नागरिकास कर्ज वसुली करणाऱ्या श्री एंटरप्रायझेस रिकव्हरी एजन्सीच्या लोकांनी त्यांच्या कार्यालयात डांबून ठेवले. त्यांच्याकडून जास्त रक्कम वसूल करण्यासाठी त्यांना शारीरिक, मानसिक त्रास देत हॉकीस्टिक, लोखंडी रॉडची भीती दाखवली. तसेच त्यांना मारहाण केल्याची घटना २६ जूनला स्वारगेट परिसरात घडली होती. याप्रकरणी ५२ वर्षीय व्यक्तीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एजन्सीच्या चालक, मालकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

''कोणी पैशांसाठी जबरदस्ती करीत असतील, शिवीगाळ, मारहाण, धमकाविणे असे प्रकार करीत असतील, त्याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्यास, अशा व्यक्ती, एजन्सीविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करून, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच संबंधित रिकव्हरी एजन्सी ज्यांच्यासाठी काम करीत आहे, त्यांच्याविरुद्धदेखील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.''

- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे.

''बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांना रिक्षा चालकांच्या रिक्षा उचलून नेण्यापूर्वी त्यांनी प्रारंभी आरटीओकडे अर्ज करून, कर्ज घेणाऱ्यास ३६ क्रमांकाची नोटीस बजावली पाहिजे, अशा दोन नोटीसांना उत्तर मिळाले नाही तर न्यायालयाकडून १०१ नुसार परवानगी घेऊनच वाहन जप्त करता येते. मात्र, ही कायदेशीर प्रक्रिया न करता फायनान्स कंपन्या, त्यांच्या रिकव्हरी एजन्सी बेकायदेशीरपणे रिक्षा उचलून नेतात.''

- बापू भावे, अध्यक्ष, पूना ऑटो रिक्षा फेडरेशन

loading image