मुलाला नाही, भविष्याच्या दृष्टीला लागला शॉक 

संदीप घिसे 
गुरुवार, 28 जून 2018

पिंपरी (पुणे) : माहेरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना दृष्टिहीन व्यक्‍तीशी विवाह करावा लागला. धुणीभांडी करून संसाराचा गाडा त्या ओढू लागल्या. मुलगी व मुलाच्या जन्मानंतर भविष्याची दृष्टी दिसू लागली. मात्र रस्त्यावरच्या विद्युत खांबाने घात केला आणि विजेचा झटका बसून मुलाच्या मृत्यूने दृष्टीच हिरावली. सरस्वती विनायक नराळ यांच्या जीवनाची ही कहाणी... 

पिंपरी (पुणे) : माहेरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना दृष्टिहीन व्यक्‍तीशी विवाह करावा लागला. धुणीभांडी करून संसाराचा गाडा त्या ओढू लागल्या. मुलगी व मुलाच्या जन्मानंतर भविष्याची दृष्टी दिसू लागली. मात्र रस्त्यावरच्या विद्युत खांबाने घात केला आणि विजेचा झटका बसून मुलाच्या मृत्यूने दृष्टीच हिरावली. सरस्वती विनायक नराळ यांच्या जीवनाची ही कहाणी... 

हरीओम विनायक नराळ (वय 9, रा.पंचशील हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. हरिओम हा महापालिकेच्या कै.मधुकर पवळे प्राथमिक शाळेत तिसरीमध्ये शिकत होता. त्याला इडली खायची असल्याने तो मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आपली बहीण रुद्राक्ष हिच्यासोबत पीठ आणण्यासाठी गेला होता. तेथून परत येत असताना त्यास उलटी आल्यासारखे झाल्याने रस्त्याच्या कडेला तो खाली बसला. उभे राहण्यासाठी त्याने रस्त्यावरील दिव्याचा आधार घेतला आणि तिथेच घात झाला. उघड्या बॉक्‍समधील वायरला त्याचा हात लागून त्यास विजेचा जोरदार झटका लागला व तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्यास वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

याबाबत बोलताना मयत हरिओम याचे मामा अशोक गाजुळ म्हणाले, "हरिओमच्या आईला घरकामातून पाच ते सहा हजार रुपये मिळतात. त्यातून तीन हजार रुपये घरभाडे जाते. उर्वरित तीन हजारात चार खाणारी तोंड. अशातही त्या आपल्या मुलांचे लाड करीत होत्या. शॉक लागण्याच्या प्रकारात महापालिकेचा गलथानपणा कारणीभूत आहे. यामुळे महापालिकेने नराळ कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी.'' 

याबाबत माहिती मिळताच महापालिका अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित केला. मात्र त्यानंतरही या ठिकाणी विद्युत प्रवाह येत असल्याचे दिसून आले. वीजचोरीसाठी खांबावरून वायर नेल्यामुळे या वायरीचा करंट पोलमध्ये उतरला. यामुळे वीजचोरीतून हा प्रकार घडला असावा, अशी शक्‍यता महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी व्यक्त केली. 

दरम्यान शहरातील बहुतांश झोपडपट्टी भागात विजेच्या खांबावरील झाकणे भंगारात विकण्यासाठी चोरीला गेली आहे. महापालिकेकडून झाकण लावल्यास ती पुन्हा चोरीला जातात. यामुळे जागोजागी असे मृत्यूचे सापळे निर्माण झाले आहेत. झाकणे चोरीला जात असलेल्या भागात काय उपाययोजना करावी, असा प्रश्‍न महापालिकेस पडला आहे. 

भोसरीतील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पोलमध्ये सहा महिन्यांपूर्वी वीजचोरीमुळे करंट उतरल्याने एका म्हशीचा मृत्यू झाला होता. यावेळी देखील महापिालका आणि महावितरण यांनी एकमेकांकडे बोट करीत आपली जबाबदारी झटकली. अशाच प्रकारची घटना आता ओटास्कीममध्ये घडली आहे.

Web Title: a boy become blind due to electric shock from poll