आजोबांची भेट राहिलीच; भरधाव टॅंकरच्या धडकेत मुलाचा मृत्यू; आई गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 March 2021

याप्रकरणी टॅंकर चालक राम बाबू खाडे (रा. आव्हाळवाडी, शिरुर, बीड) यास अटक केली आहे.

पुणे : मुलाला घेऊन भावाला भेटण्यासाठी निघालेल्या महिलेच्या दुचाकीला भरधाव टॅंकरने धडक दिली. या अपघातात महिलेचा सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला. तर महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी दुपारी दोन वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील (आरटीओ) चौकात घडली. या घटनेनंतर बंडगार्डन पोलिसांनी टॅंकर चालकास अटक केली. 

श्री दत्तात्रय थोरात (वय 7, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे अपघातात मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. तर मनिषा दत्तात्रय थोरात (वय 38) या अपघातात गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी भारत थोरात (वय 35, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टॅंकर चालक राम बाबू खाडे (रा. आव्हाळवाडी, शिरुर, बीड) यास अटक केली आहे.

Breaking : पुण्यात आगीच्या दोन घटना; पुणे-सोलापूर हायवेवर ट्रॅफिक जाम​

फिर्यादी यांचे वहिनी मनीषा आणि त्यांचा मुलगा श्री हे दोघेजण शनिवारी दुपारी मनीषा यांच्या चाकण येथे राहणाऱ्या भावाला भेटण्यासाठी दुचाकीवरुन जात होत्या. शनिवारी दुपारी दोन वाजता त्यांचा दुचाकी आरटीओसमोरील चौकातील पेट्रोल पंपा समोरून संगम पुलाच्या दिशेने वळत होत्या. त्यावेळी राम खाडे याने त्याच्या ताब्यातील भरधाव टॅंकरने मनीषा यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरुन खाली पडले. या अपघातात मनीषा यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली, तर श्रीच्या डोक्‍याला जबर मार लागला. त्यास तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

होय, मी मित्रांसाठी काम करतो; पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींची 'मन की बात'!​

आजारी वडीलांना भेटण्यासाठी जाणार होते भाऊ-बहिण 
मनीषा थोरात यांचे वडील आजारी आहेत. त्यामुळे वडीलांना भेटण्यासाठी त्यांना जायचे होते. चाकण येथे भावाकडे जाऊन तेथून त्याच्यासमवेत वडीलांना भेटण्यासाठी ते जाणार होते. त्यासाठीच त्या मुलगा श्रीला घेऊन निघाल्या होत्या. मात्र भावाकडे पोचण्यापूर्वीच झालेल्या अपघातामध्ये श्रीचा मृत्यु झाला, असे पोलिस उपनिरीक्षक गोरड यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy died and his mother seriously injured in accident after tanker hit two wheeler in Pune