

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.१३ : जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या युद्धांच्या आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेची आज यशस्वी सांगता झाली. ‘‘या परिषदेत सर्व सदस्य देशांच्या संमतीने पारित करण्यात आलेला ‘नवी दिल्ली जाहीरनामा-२०२६’ हा आमच्या संयुक्त संकल्पाला स्पष्ट दिशा देणारा असून या संकल्पांना ठोस परिणामांमध्ये बदलणे ही आपली जबाबदारी आहे,’’ अशी अपेक्षा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेचा समारोप करताना व्यक्त केली.
समारोपाच्या सत्रात आज पंतप्रधान मोदी यांनी परिषदेत झालेल्या चर्चा, प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक विषयांवरील मतांचा समावेश तसेच ब्रिक्स सहकार्याला अधिक सुदृढ करण्याच्या प्राधान्यांचा समावेश असलेला ‘ब्रिक्स नवी दिल्ली जाहीरनामा २०२६’ चा मसुदा सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांपुढे मांडला आणि तो सर्वसंमतीने स्वीकारण्यात आला. पुढच्या वर्षी होणाऱ्या एकोणविसाव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद भूषविणाऱ्या चीनला पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ब्रिक्सच्या दोन दशकांच्या प्रवासानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी दोन टपाल तिकिटांचे विमोचन केले. ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविताना सदस्य देशांचे बहुमूल्य योगदान, विधायक भावना आणि कटिबद्धतेसाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत ब्रिक्स शिखऱ परिषदेच्या समारोपाची पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली. या समारोप सोहळ्यानंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्यासह सदस्य देशांचे प्रमुख राजधानी दिल्लीचा निरोप घेत आपापल्या देशांकडे रवाना झाले.
आजची बैठक अतिशय सार्थक आणि रचनात्मक ठरली, असे समारोपाच्या भाषणात मोदी म्हणाले. ‘‘आमच्या विचारांच्या विविधतेसोबत ब्रिक्स सहयोगाविषयीची आमची संयुक्त कटिबद्धताही स्पष्टपणे समोर आली आहे. बदलत्या जगाचे संचालन जुन्या संस्थांच्या माध्यमातून होऊ शकत नाही, हे आजच्या चर्चेने स्पष्ट झाले आहे. प्रतिनिधित्व, प्रतिसाद आणि नियम तयार करणे या तिन्ही गोष्टींमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्यांच्या नियमांच्या निर्मितीत दक्षिणी जगाची बरोबरीची भागीदारी व्हायला हवी, यावरही आम्ही भर दिला. निर्णय आणि त्यांच्या परिणामांमधील अंतर कमी करण्यासाठी भागीदारी आणि सामूहिक कृतीने काम करावे लागेल. आज स्वीकारलेला नवी दिल्ली जाहीरनामा आमच्या संयुक्त संकल्पाला स्पष्ट दिशा देणारा आहे. या संकल्पांना ठोस परिणामांमध्ये बदलणे ही आपली जबाबदारी आहे,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
कोट
बाह्य दबावाला न जुमानता ब्रिक्स आणि जागतिक दक्षिणेतील देशांनी आर्थिक सहकार्य वाढवावे.
- व्लादीमिर पुतीन, अध्यक्ष, रशिया
ब्रिक्स’मधील औद्योगिक आणि पुरवठा-साखळी सहकार्य अधिक मजबूत करून बाजारपेठांमध्ये अधिक एकात्मता निर्माण करण्याच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी एआय आणि डिजिटलायझेशन असावे.
- शी जिनपिंग, अध्यक्ष, चीन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.