esakal | नवी नवरी दोनच दिवसात दागीने, कपडे व रोकड़ घेवून पळाली | Crime
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
नवी नवरी दोनच दिवसात दागीने, कपडे व रोकड़ घेवून पळाली

नवी नवरी दोनच दिवसात दागीने, कपडे व रोकड़ घेवून पळाली

sakal_logo
By
विजय जाधव

भोर (पुणे) - लग्न केलेल्या नव्या नवरीने अवघ्या दोन दिवसात घरातील दागदागीने, रोकड आणि साड्या घेवून पोबारा केल्याची घटना निगुडघर (ता.भोर) येथे घडली. या घटनेमुळे लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून पैसे, सोने, साड्या व इतर मौल्यवान वस्तू घेवून जाण्याचे लोन आता भोरच्या ग्रामीण भागात सुरु झाले आहे. नगर जिल्ह्यातील नव-या मुलीसह मध्यस्ती करणा-या पाच जणांवर भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे.

नवरदेवाचे वडील कैलास बबन लिंभारे (वय 65, रा. निगडुघर) यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहीती अशी. निगुडघर येथील कैलास लिंभारे यांना कापडगाव (ता.फलटण, जि. सातारा) येथे पुर्नवसनातून जमिन मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे कापडगावला येणे-जाणे असते. कापडगाव येथील त्यांच्या जमिनीशेजारी असलेल्या बाबू जाधव यांना त्यांनी मुलगा दिगंबर याला लग्नासाठी मुलगी बघण्याचे सांगितले होते. बाबू जाधव याने सुरेश मारुती बुधावले (रा. दहीगाव, ता. माळशिरस, जि.सोलापूर) याच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर सुरेश बुधावले याने राजू अवघडे व

बापजी कृष्णा चव्हाण यांच्यामदतीने पेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील राजू देवते यांची मुलगी मनिषा ही लग्नाची असल्याचे सांगितले. परंतु यासाठी त्यांनी 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी केली. मुलाचे लग्न जमणार म्हणून लिंभारे यांनी त्यास सहमती दर्शवली. मुलीचे गाव लांब असल्यामुळे आपण लग्नाच्या तयारीनेच जाऊ असे सुरेश बुधावले, राजू अवघडे व बापजी चव्हाण यांनी लिंभारे यांना सांगितले.

हेही वाचा: गरिबांची दिवाळी व्यवस्थित जाऊ द्या ; रेशनकार्डधारकांची सरकारकडे मागणी

त्यानुसार शुक्रवारी (ता.1 ऑक्टोंबरला) निगुडघर येथून नवरा मुलगा दिगंबर लिंभारे याच्यासह 9 जण इको गाडीने (क्रमांक एम एच 05 बी एस 5458) पेडगावला सायंकाळी साडेपाच वाजता गेले. यामध्ये नवरा दिगंबर लिंभारे, वडील कैलास लिंभारे, सिंधूबाई लिंभारे, मालन शेडगे, राजेंद्र साळेकर यांच्यासह लग्न जमवणारे बाबू जाधव, सुरेश बुधावले, राजू अवघडे व बापजी चव्हाण आदींचा समावेश होता. जाताना त्यांनी दौंडमधून मुलीला 22 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, चांदीच्या पट्ट्या व जोडवे घेतले. आणि श्रीगोंदा येथून मुलीसाठी 3 हजाराच्या साड्याही घेतल्या. त्यावेळी बापजी चव्हाण व राजू अवघडे यांनी कैलास लिंभारे यांच्याकडून 60 हजार रुपये घेतले. पेडगावला गेल्यावर राजू देवते हा मुलगी मनिषा राजेंद्र पवार हिचा काका असल्याचे सांगितले. पेडगाव येथे लग्न लावून सायंकाळी साडेसात वाजता नवरी मुलगी मनिषा पवार हिच्यासमवेत परत माघारी निघाले आणि रात्रीत निगुडघर येथे आले. रविवारी (ता.3) कैलास लिंभोरे हे कापडगावला गेले. तेंव्हा घरात नवरा मुलगा दिगंबर, त्याची आई अलका लिंभारे, नवविवाहिता मनिषा होते. सोमवारी (ता. 4) पहाटे पाच वाजता मनिषा ही घरातील सोने, साड्या आणि रोख 5 हजार रुपये घेऊन पळून गेली. त्यानंतर कैलास लिंभोरे यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नव-या मुलीसह बाबू जाधव, सुरेश बुधावले, राजू अवघडे व बापजी चव्हाण यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. भोरचे पोलिस उपनिरीक्षक बळीराम सांगळे पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top