esakal | गरिबांची दिवाळी व्यवस्थित जाऊ द्या ; रेशनकार्डधारकांची सरकारकडे मागणी | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

pune

गरिबांची दिवाळी व्यवस्थित जाऊ द्या ; रेशनकार्डधारकांची सरकारकडे मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘सणासुदीत दिवाळीला पूर्वी रेशनवर गहू, तांदळासोबतच पाम तेल, साखर, चणा डाळ, रवा-मैदा मिळायचा. हळू हळू रवा मैदा गेला, पुन्हा पाम तेल बंद झाले. मागच्या दिवाळीत काहीजणांना चणा डाळ आणि साखर मिळाली. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून आर्क्षिक परिस्थिती खराब आहे. रेशनवर सध्या तांदूळ निकृष्ट दर्जाचा दिला जात आहे. आम्हीही माणसंच आहोत, असा खराब तांदूळ कसा खायचा? किमान यंदाच्या दिवाळीत किमान पाम तेल, साखर, चणा डाळ उपलब्ध करून द्यावी. गरीब लोकांची दिवाळी तरी व्यवस्थित जाऊ द्या,’ ही प्रातिनिधीक मागणी आहे मार्केट यार्डलगतच्या आंबेडकर नगरमधील सचिन पवार यांची.

रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत दिला जातो. पुढील नोव्हेंबरपर्यंत हे मोफत धान्य दिले जाईल. तर, राज्य सरकारकडून दोन रुपये किलो दराने तीन किलो गहू आणि तीन रुपये दराने दोन किलो तांदूळ दिला जात आहे. त्यातही तांदळाचा दर्जा खराब असून, तो कसाबसा खावा लागत आहे.

या संदर्भात अन्नधान्य वितरण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘यापूर्वी भारतीय खाद्य महामंडळाकडून (एफसीआय) मध्यप्रदेश, पंजाब आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून रेल्वेने एफसीआयच्या गोदामांपर्यंत तांदूळ येत होता. सध्या भंडारा आणि गोंदियामधून ट्रकद्वारे वाहतूक करून तांदूळ मागविण्यात येत आहे. परंतु पावसात भिजल्यामुळे तांदूळ खराब झाला आहे.’

राज्य सरकारने अनुदान बंद केल्यामुळे पाच वर्षांपासून रेशनवर पामतेल देणे बंद आहे. गेल्या दिवाळीत साखर उपलब्ध करून दिली होती. यावर्षी दिवाळीत पाम तेल, रवा, मैदा, चणा डाळ आणि साखर उपलब्ध करून द्यावी, अशी शिधापत्रिकाधारकांची मागणी आहे. रेशन दुकानदार संघटनेमार्फत अन्नधान्य वितरण कार्यालयाला निवेदन देण्यात येणार आहे. रेशन दुकानदार आणि शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नांबाबत राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी प्रशासन आणि रेशन दुकानदार संघटनेची बैठक बोलवावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष गणेश डांगी यांनी केली आहे.

हेही वाचा: तिसरे अपत्य असल्याने वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या शुभांगी कानडे अपात्र

लॉकडाउनच्या कालावधीत नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. सरकारने रेशन दुकानातून गहू, तांदूळ यासोबतच तेल, साखर, रवा आणि मैदाही उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून आम्हाला फराळाचे गोडधोड पदार्थ करून दिवाळीचा सण साजरा करता येईल.

- विजय कोठावळे, शिधापत्रिकाधारक, टिंबर मार्केट

दिवाळीत सणासुदीच्या कालावधीत रेशनवर साधारणपणे साखर आणि चणाडाळ उपलब्ध करून दिली जाते. या संदर्भात शासन स्तरावर अद्याप काही निर्णय झालेला नाही.

- सचिन ढोले, अन्नधान्य वितरण अधिकारी

(पुणे, पिंपरी चिंचवड शहर)

शिधापत्रिकाधारकांची संख्या :

३ लाख १ हजार ८८६

लाभार्थी संख्या : १२ लाख ४३ हजार १४८

पुणे जिल्हा ग्रामीण :

शिधापत्रिकाधारक संख्या : ५ लाख ३२ हजार

लाभार्थी संख्या :

सुमारे २४ लाख ७१ हजार

loading image
go to top