फर्ग्युसन रस्त्यावरून ब्रिटिश लायब्ररी हलणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

पुणे - जिथल्या पुस्तकांनी पुण्यात वाचनसंस्कृतीचं एक नवं पर्व रुजवलं होतं, अशी फर्ग्युसन रस्त्यावरची ब्रिटिश लायब्ररी आता या रस्त्यावर पाहायला मिळणार नाही. सन १९६० मध्ये पुण्यात सुरू झालेल्या ज्या ब्रिटिश लायब्ररीने आजवरच्या वाचकांचं बौद्धिक भरणपोषण मोठ्या निगुतीनं घडवलं, तिची आणि फर्ग्युसन रस्त्याची अतूट ओळख आता पुसली जाणार आहे. कारण ही लायब्ररी आता फर्ग्युसन रस्त्यावरून शिवाजीनगर येथे हलवली जाणार आहे. 

साठोत्तरी कालखंडाच्या सुरवातीपासूनच उत्तमोत्तम आंतरराष्ट्रीय लेखनाशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीला अर्थात पुण्याला संमुख करणारं एक महत्त्वाचं नाव होतं फर्ग्युसन रस्त्यावरची ब्रिटिश लायब्ररी ! या रस्त्यावरच्या इतरही काही जुन्या पुस्तकांच्या दुकानांसोबत ही लायब्ररी मोठ्या दिमाखात पुणेकरांना वाचनाचा आनंद देत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत फर्ग्युसन रस्त्यावरची पुस्तकांची दुकानं एकेक करत बंद पडत गेली. आता त्यात ब्रिटिश लायब्ररीच्या नावाचीही भर पडली. यामुळे फर्ग्युसन रस्त्याची ‘पुस्तकांचा रस्ता’ ही पूर्वीची ओळख आता पुसली जाण्याची खंत अनेक वाचकांनी व्यक्त केली आहे.

येत्या २९ मे रोजी ब्रिटिश लायब्ररीचा सध्याच्या पत्त्यावरील अखेरचा दिवस असून, १० जून रोजी नवीन पत्त्यावर लायब्ररीचे कामकाज सुरू होणार आहे. २९ मे ते ९ जून कामकाज बंद राहणार आहे.

नवा पत्ता शिवाजीनगर
फर्ग्युसन रस्त्यावरून आता ब्रिटिश लायब्ररी शिवाजीनगरच्या भागात स्थलांतरित होणार आहे. संचेती रुग्णालयाशेजारी गणेशखिंड रस्त्यावर लायब्ररीचा नवा पत्ता आहे. नवी जागा आत्ताच्या जागेपेक्षा अधिक क्षमतेची असल्याचे लायब्ररीच्या मुंबई मुख्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. नव्या जागेत अधिक पुस्तकं, तसेच ध्वनिमुद्रिका उपलब्ध होणार असून, अधिक वाचकांना त्याचा उपयोग करून घेता येईल, असेही लायब्ररीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

फर्ग्युसन रस्त्यावरून ब्रिटिश लायब्ररी हलवली जाणं, ही दुःखद बातमी आहे. एके काळी या रस्त्यावरची एक अतिशय महत्त्वाची सांस्कृतिक देवाणघेवाणीची जागा म्हणून या लायब्ररीकडे पाहिले जात असे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या लायब्ररीमुळे अनेक संदर्भ चटकन उपलब्ध होत असत. मात्र, आता अनेक इतर बंद झालेल्या दुकानांप्रमाणेच ब्रिटिश लायब्ररीसुद्धा दुसरीकडे हलल्यानंतर वाचकांचे पर्याय अधिक संकुचित होत जातील.
- प्रशांत ताले (एम. के. बुक कॉर्नर या पुस्तकाच्या दुकानाचे मालक. फर्ग्युसन रस्त्यावरील हे दुकान आता बंद पडले आहे.)

Web Title: The British Library will move from Ferguson Street