'विश्‍वशांतीसाठी बंधुतेची आवश्‍यकता'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

पिंपरी -  ‘‘अणुचाचण्यांमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. ते टाळून विश्‍वशांती निर्माण करण्यासाठी राज्यघटनेतील बंधुता तत्त्वाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 

पिंपरी -  ‘‘अणुचाचण्यांमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. ते टाळून विश्‍वशांती निर्माण करण्यासाठी राज्यघटनेतील बंधुता तत्त्वाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्यातर्फे भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रा. प्रकाश पगारिया व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदावरून डॉ. सबनीस बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. बंधुता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, मुख्य संयोजक प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, महेंद्र भारती, कवी चंद्रकांत वानखेडे, कवयित्री मधुश्री ओव्हाळ, संगीता झिंजुरके, सेवानिवृत्त परिवहन अधिकारी हरिश्‍चंद्र गडसिंग आदी उपस्थित होते. 

डॉ. सबनीस यांच्या भाषणाचे ‘आम्ही भारतीय’, डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘बंधुताचार्यांची प्रकाशगाथा’, ‘अग्निकुंड’ या ग्रंथांचे आणि ‘मूल्याविष्कार’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संमेलनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली. 

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘महंमद पैगंबरांपासून येशू ख्रिस्तांपर्यंत, संत ज्ञानेश्‍वरांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्व संत, माहात्म्य, महापुरुषांनी विश्‍वशांतीचा संदेश दिला आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी राज्यघटनेत स्वातंत्र, समता, बंधुता, सामाजिक न्याय या चार तत्त्वांचा अंगीकार केला आहे. त्यातील बंधुतेचा राज्यकर्त्यांसह अनेकांना विसर पडला आहे. राज्या-राज्यांमध्ये, देशा-देशांमध्येच नव्हे, तर कामगार व भांडवलदार, स्त्रिया व पुरुष यांच्यात बंधुभाव वाढवावा लागणार आहे. कारण, भावना व विचारांच्या एकत्रिकरणात बंधुता आहे. तिच्याशिवाय समता प्रस्तावित होणे शक्‍य नाही.’’

उद्‌घाटक ॲड. आव्हाड म्हणाले, ‘‘आपली राज्यघटना ही सर्वांत मोठे साहित्य आहे. तिच्या उद्देशपत्रिकेतच सर्व सार आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बंधुतेचा विचार रुजविणाऱ्या महापुरुषांना आपण जातीयतेत व समाजासमाजात वाटून घेतले आहे. त्यामुळे आम्ही दिशाहीन झालो आहोत. स्वार्थी राजकारणाच्या आहारी गेलो आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी व समाजाला जागे करण्यासाठी बंधुतेची गरज आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brotherhood Need for World Peace says shripal sabnis