बीआरटीतील मेट्रोच्या कामामुळे कोंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सेवारस्त्यावर दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी चालकांना लागतो अर्धा तास
पिंपरी - मेट्रोने पिलरच्या कामासाठी एम्पायर इस्टेट ते मोरवाडीदरम्यान बीआरटी मार्गालगत केलेले बॅरिकेटिंग, सेंट्रल मॉलसमोरील रस्त्यावर पार्किंग केलेली वाहने, या कारणांमुळे सेवारस्त्यावरील वाहनचालकांना दोन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा तास खर्च करावा लागत आहे. तीन महिन्यांपासून सुरू असणारा वाहतूक कोंडीचा त्रास काही केल्या नागरिकांची पाठ सोडताना दिसत नाही. 

सेवारस्त्यावर दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी चालकांना लागतो अर्धा तास
पिंपरी - मेट्रोने पिलरच्या कामासाठी एम्पायर इस्टेट ते मोरवाडीदरम्यान बीआरटी मार्गालगत केलेले बॅरिकेटिंग, सेंट्रल मॉलसमोरील रस्त्यावर पार्किंग केलेली वाहने, या कारणांमुळे सेवारस्त्यावरील वाहनचालकांना दोन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा तास खर्च करावा लागत आहे. तीन महिन्यांपासून सुरू असणारा वाहतूक कोंडीचा त्रास काही केल्या नागरिकांची पाठ सोडताना दिसत नाही. 

चिंचवडवरून पुण्याकडे जाणाऱ्या सेवारस्त्यावर सेंट्रल मॉलपासून ते खराळवाडीदरम्यान सकाळी आणि संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. मॉलजवळील बीआरटी मार्गामध्ये मेट्रोने पिलर उभा करण्यासाठी खड्डा खोदला होता. मात्र, त्याच्या डिझाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काही दिवसांपूर्वी एक खड्‌डा मेट्रोने बुजवला आहे. या परिसरात अपघात व्हायला नको, म्हणून त्या ठिकाणी केलेले बॅरिकेड्‌स मेट्रोने काढलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावरील दोन लेन वाहतुकीसाठी बंद आहेत. मेट्रो आणि बीआरटीच्या कामामुळे सेवारस्ता लहान झालेला असताना दुसरीकडे सेंट्रल मॉलसमोरील रस्त्यावर वाहनचालक बेकायदा पार्किंग करतात. त्यामुळे रस्त्यावरील कोंडीमध्ये भर पडते. मोरवाडीच्या पुढील रस्त्यावर अशीच परिस्थिती आहे. डॉ. आंबेडकर चौकातून खराळवाडीकडे जातानादेखील मेट्रोने बीआरटी मार्गात खणून ठेवले आहे. त्यामुळे तिथला रस्ता लहान झाला आहे. चौकामध्येच प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालक थांबलेले असतात, त्यामुळे इथे कायम वाहतूक कोंडी होत असते. मेट्रो प्रशासन आणि महापालिका या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहात नसल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. 

दरम्यान, महापालिकेने मेट्रो प्रशासनाला बीआरटी मार्गातील खांब बाहेरच्या बाजूस घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे खराळवाडी ते सेट्रल मॉल पुलापर्यंतच्या सेवारस्त्याची रुंदी दोन मीटरने कमी होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार आहे. या मार्गावर रस्ता रुंदीकरण करणे शक्‍य नाही. खराळवाडीकडून जाणाऱ्या रस्त्यालगत एमआयडीसीच्या पाण्याची लाइन आहे. रस्त्याच्या मध्यभागी ग्रेडसेपरेटर असून, त्याच्या बाजूला असणाऱ्या खडकाची काळजी घेणे आवश्‍यक आहे, या कारणांमुळे इथले रस्तारुंदीकरण करणे अवघड आहे.

सर्व आकडेवारी मीटरमध्ये
जुन्या पुणे-मुंबई रस्त्याची रुंदी ६१
बीआरटी रस्ता ३.५ 
सेवारस्ता ९ ते १०.५०
पदपथ २.५ ते ३ 
ग्रेडसेपरेटर १९ 

घटनाक्रम 
मेट्रोने बीआरटी मार्गामध्ये काम करण्यास सुरवात केली - ११, एप्रिल २०१८
महापालिकेने काम थांबवण्यासाठी पत्र दिले - २० एप्रिल २०१८
बीआरटी मार्गावर महापालिकेने बसची चाचणी घेतली - २४ आणि २५ एप्रिल २०१८

मेट्रोला महापालिका भवनासमोरील पार्किंगचे नियोजन करण्यासाठी प्रेझेंटेशन सादर करण्यास सांगितले आहे. पालिका प्रशासनासमोर ते सादर झाल्यानंतर या परिसरातील रस्ता रुंदीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. 
-विजय भोजने, प्रवक्‍ता, बीआरटी. 

नागरिक म्हणतात....
सेंट्रल मॉल ते खराळवाडीदरम्यानच्या सेवारस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिस आणि मेट्रो प्रशासन यांनी नियोजन करण्याची गरज आहे. मॉलसमोर थांबणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी सतत कारवाई करायला हवी. याखेरिज या मोरवाडी आणि खराळवाडीच्या चौकातील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करण्याची गरज आहे. चिंचवडवरून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सर्वाधिक वेळ दिला तर या भागातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल. 
- संदीप राऊत, नागरिक. 

Web Title: BRT Metro work traffic