बीआरटी प्रकल्पात गैरव्यवहार? - नगरसेवक ॲड. भोसले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

पिंपरी - बीआरटी प्रकल्पाबाबत महापालिकेच्या लेखा आणि माहिती विभागाच्या आकडेवारीत ११४ कोटी रुपयांची तफावत असून, यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून, न्यायालयातही दाद मागणार आहे. या प्रकरणाशी संबंधित महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची चौकशी सक्‍तवसुली संचनालयाकडून करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, शहर प्रमुख योगेश बाबर, संघटिका सुलभा उबाळे या वेळी उपस्थित होते. दहा वर्षांमध्ये शहरात ७५ किलोमीटर बीआरटी मार्ग करण्यात येणार होते. प्रत्यक्षात २२.५ किलोमीटर बीआरटी मार्गाचे काम झाले आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये औंध ते रावेत, नाशिक फाटा ते वाकड आणि काळेवाडी ते देहू आळंदी या बीआरटी मार्गावर ८९०.४७ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती महापालिकेचे मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी आणि जेएनएनयूआरएमचे समन्वयकांनी दिली. याच मार्गावरील कामासाठी आतापर्यंत ७७६.०८ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती महापालिकेच्या लेखाधिकाऱ्यांनी दिली. या दोन्ही रकमेमध्ये ११४.३९ कोटी रुपयांचा तफावत असल्याचे भोसले यांनी निदर्शनास आणले. 

बीआरटी प्रकल्पाच्या रकमेतून महापालिका पदाधिकारी, ठेकेदारांचे हितसंबंध जपण्यात आले आहेत. नागरिकांचा कर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमताने हडप केला असल्याचा भोसले यांचा आरोप आहे. शहरामध्ये बीआरटीचे ८४ बसथांबे उभे करण्यात आले आहेत. एक बसथांबा उभारण्यासाठी ४५ ते ५० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. निगडी ते दापोडी मार्गावरील बीआरटी प्रकल्पाबाबत न्यायालयात प्रलंबित आहे, असे असताना देखील पालिका प्रशासनाने २०१७-१८ मध्ये या मार्गावर अर्थसंकल्पातून ४.९८ कोटी रुपये खर्च केले आहेत. 

शहरामध्ये पीएमपीच्या ५५९ बस धावतात. महापालिका दर महिन्याला पीएमपीला सात कोटी ५० लाख रुपये देते. बीआरटीमध्ये गैरव्यवहार झालेली रक्‍कम महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी भोसले यांनी या वेळी केली.

Web Title: BRT Project Non behavioral sachin bhosale