पुणे : कमाईत ‘बीआरटी’च भारी

पुणे : कमाईत ‘बीआरटी’च भारी

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील बीआरटीची वाटचाल रडतखडत सुरू असली, तरी असलेल्या पाच मार्गांचे उत्पन्न साध्या बसच्या तुलनेत जास्त असल्याचे पीएमपीने घेतलेल्या आढाव्यात आढळून आले आहे. त्यामुळे बीआरटीला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीचे सुमारे ३०० मार्ग आहेत. त्यातील बीआरटीच्या मार्गांवर सध्या सुमारे २५० बसची वाहतूक होते. संगमवाडी-विश्रांतवाडी, पर्णकुटी-चंदननगर, दापोडी-निगडी, औंध-किवळे, नाशिक फाटा-वाकड या मार्गांवर सध्या बीआरटी कार्यान्वित आहे. मात्र, यातील काही मार्गांवर अंशतः बीआरटी सुरू आहे. बीआरटीचा वापर करून सुमारे ९० मार्गांपर्यंत पोचणे प्रवाशांना शक्‍य झाले आहे. पीएमपी प्रशासनाने आढावा घेतल्यावर बीआरटी मार्गांवरील प्रतिबसचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या साध्या बसच्या तुलनेत जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बीआरटी मार्गांचा विस्तार करावा, यासाठी पीएमपीकडून दोन्ही महापालिकांकडे पाठपुरावा सुरू आहे अन्‌ त्यासाठीच सीएनजीवर धावणाऱ्या  सुमारे ३०० बस भाडेतत्त्वावर घेण्याची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी नुकतीच केली आहे. शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये १५० किलोमीटर मार्गांवर बीआरटी कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकारने २००७ पासून सुमारे ११०० कोटी रुपये दोन्ही महापालिकांना दिले आहेत. दोन्ही महापालिकांनी बीआरटीसाठी रस्ते बांधणी केली आहे; परंतु बीआरटीसाठी निश्‍चित करण्यात आलेल्या बहुतेक रस्त्यांवर अजूनही बीआरटी कार्यान्वित झालेली नाही. बीआरटीसाठी पीएमपीने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. बीआरटीच्या थांब्यांवर आणि बसमध्येही प्रवाशांना पुढील थांबा कोणता आहे, याची अनाउन्समेंट ऐकायला मिळेल, एलईडीचे डिजिटल डिस्प्ले बोर्ड असतील, असे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात प्रवाशांपासून या सुविधा कोसो अंतर दूर असल्याचे सध्याचे चित्र आहे.

मार्गांच्या घोषणा हवेतच  
बीआरटी मार्गांच्या विस्तारासाठी महापालिका प्रशासनाने लागापोठ चार वर्षे प्रत्येकी ६७ कोटी, ५० कोटी, २८ कोटी आणि ८६ कोटी रुपयांची तरतूद केली होती. प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांत बीआरटीचा एकही नवा मार्ग कार्यान्वित झालेला नाही. महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने बीआरटी सक्षम करण्याची घोषणा केली होती; परंतु, बस खरेदी वगळता बीआरटीकडे दुर्लक्षच झाले आहे.

म्हणून उपयुक्त 
बसच्या फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण कमी 
ब्रेक डाऊनची संख्या कमी  
सुलभ वाहतुकीमुळे इंधनबचत  
बसची (इंजिन, टायर आदी) झीज कमी 
अपघातांचे प्रमाण अत्यल्प  

पुणे आणि पिंपरी- चिंचवडसाठी बीआरटी उपयुक्तच आहे. त्यामुळे अधिकाधिक मार्गांवर बीआरटी सुरू व्हावी, यासाठी पीएमपीतर्फे अध्यक्ष नयना गुंडे यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. बीआरटी मार्गांचा विस्तार करण्यासाठीच नव्या बस येत आहेत. 
- अनंत वाघमारे,  वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com