पोरीला शाळेत पाठवू की नको?

पोरीला शाळेत पाठवू की नको?

पिंपरी : ‘‘पूर्वी त्या दोघी एकत्र शाळेला जायच्या. त्यांचा एकमेकींना आधार होता. या घटनेनंतर आता एवढ्या लांब एकटीला कशी पाठवायची, पोरीला शाळेत पाठवायचं की नाही याबाबत आम्ही विचार करीत आहोत,’’ अशी चिंता कासारसाई येथील पीडित मुलीच्या आईने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केली. तर आरोपींना शिक्षा नको तर  फाशीच द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

कासारसाई येथे दोन बारावर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. त्यापैकी एकीचा मृत्यू झाला. याबाबत पीडित मुलीची आई बोलत होती. ‘‘या वर्षी या गावाला तर पुढल्या वर्षी दुसऱ्या गावाला. आमचं हातावरचं पोट, कामावर गेलो तर चूल पेटणार. आम्ही कामावर गेल्यावर घरी एक मुलगा आणि मुलगीच असते. त्यांना एकटं सोडून जायला नको वाटतं. मात्र, त्यांनी शिकावं, मोठं व्हावं, यासाठी काळजावर दगड ठेवून आम्ही नवरा- बायको कामावर जातो. एखाद्या दिवशी पोरीनं शाळेला दांडी मारली, की लगेच मुख्याध्यापकांचा फोन येतो. अशावेळी काम सोडून पोरांना बघायला घरी यावं लागतं. मग कसला रोजगार आणि कसलं काय. पोरीला झुडपात मारून टाकली असती तरी लवकर कोणाला कळलं नसतं.’’

‘पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे’
हिंजवडी ः पीडित मुलींच्या नातेवाइकांनी पोलिसांवर केलेला आरोप चुकीचा व गैरसमजुतीतून झाला आहे. पीडित मुलीचे जबाब घेताना महिला अधिकाऱ्यांनी मुलींना विश्वासात घेऊनच घडलेल्या घटनेची माहिती घेतली. त्यानंतरच हा प्रकार बलात्काराचा असल्याचे उघड झाले. नातेवाईकांसमोर बोलण्यास मुलगी घाबरत होती. त्यामुळे नातेवाइकांना बाहेर थांबविले म्हणजे दुय्यम वागणूक दिली, असे होत नाही, असे स्पष्टीकरण पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले.

कासारसाई बलात्कार प्रकरण गरिबाला इज्जत नसते का?
‘‘पोरीचं नाव पेपरला आलं नाही. मात्र, नात्यातल्याच काही लोकांनी सगळ्या गावभर बोंब केली. ओळखी-पाळखीच्या लोकांचे फोन यायला लागले. काय झालं, कसं झालं, आता काय करणार, अशा प्रश्‍नांचा भडिमार करतात. त्यांना उत्तरं देताना नको-नको झालं. तुम्ही सांगा साहेब, गरिबाला इज्जत नसते का, पोरगी आता लहान आहे. पण मोठी झाल्यावर असं माहिती पडल्यावर तिच्याशी कोण लग्न करणार,’’ असा सवालही पीडित मुलीच्या आईने केला. या घटनेत एकीचा जीव गेलाय, तर दुसरीच्या मनावर प्रचंड आघात झालाय. यामुळे आरोपींना फाशीच द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘ती’ आजारी आहे

पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीला तिच्या मैत्रिणीबाबत विचारणा केली. चल तिला भेटायला जाऊ, असे तिची आई तिला म्हणाली. मात्र, तिच्या पोटात दुखत असून ती दवाखान्यात आहे, असे तिने आपल्या आईला सांगितले. मैत्रिणीच्या मृत्यूबाबत ती अद्यापही अनभिज्ञ आहे.

गावाचे नाव देऊ नका
ज्या मुलीवर अत्याचार झाले आणि ज्यांनी अत्याचार केले ते दोघेही आमच्या गावाचे नव्हते, ते बाहेरून आलेले आहेत. यामुळे आमच्या गावाचे नाव देऊन बदनाम करू नका, असे काही स्थानिकांनी सांगितले.

पोलिसांचा खडा पहारा
पीडित मुलीच्या घरी भेट देण्यासाठी राजकीय मंडळी येत आहेत. तसेच, त्या कुटुंबास कोणी धमकावू नये, यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी एक गाडी उभी केली आहे.

मृत्यूचे कारण गुलदस्तातच
सा  मूहिक लैंगिक अत्याचार झालेल्या त्या मुलीवर बलात्कार नव्हे तर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. मात्र मृत्यूचे कारण समजू न शकल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तर दुसऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. कासारसाई येथे रविवारी (ता. १६) चॉकलेटचे आमिष दाखवून दोन मुलींवर दोघांनी लैंगिक अत्याचार केला. त्यापैकी एकीवर दोघांनी अत्याचार केले. पीडित मुलीवर उपचार सुरू असताना बुधवारी (ता. १९) तिचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्या वेळी तिच्यावर बलात्कार नव्हे तर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र मृत्यूचे कारण समजू न शकल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. न्यायवैद्यक विभागाकडून व्हिसेराचा अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार आहे. तसेच दुसऱ्या पीडित मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितले.

केवळ भेट, मदत नाहीच
गेल्या दोन दिवसांपासून राजकीय पक्षांचे लोक भेटायला येतात. पोरीच्या डोक्‍यावरून हात फिरवतात. काही मदत लागली तर सांगा, असंही म्हणतात. त्यांच्या पेपरात बातम्या येतात. मात्र प्रत्यक्षात कोणीच काहीच मदत करीत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com