‘बीएसएनएल’३जी वरच अडकले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे - इंटरनेटची ४ जी सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत. परंतु, सर्वांत प्रथम ३जी सेवा देणारी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीला मागील चार वर्षांपासून सरकारने ४जी सेवा का सुरू करू दिली नाही. यातून खासगी कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे काम सुरू असल्याची टीका ‘मिशन राजीव’ काँग्रेसने केली. 

‘बीएसएनएल’च्या ग्राहकांसाठी तातडीने ४जी सेवा सुरू करावी, या मागणीसाठी ‘मिशन राजीव’च्या वतीने बाजीराव रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘मिशन राजीव’चे संस्थापक व काँग्रेसचे माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक शिवा मंत्री, शहर काँग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब मारणे, पीएमटी कामगार संघ इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे उपस्थित होते.

तिवारी म्हणाले, की बीएसएनएलचे कोट्यवधी ग्राहक ४जी सेवेपासून वंचित आहेत. यासाठी त्यांना खासगी कंपन्यांकडे जावे लागत असून, यामधून बीएसएनएलचे मोठे नुकसान होत आहे. रिलायन्सच्या जिओ व इतर खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रचंड मोठा गैरव्यवहार असून, याची महालेखापालद्वारे चौकशी करावी. या वेळी स्वाक्षरी मोहीम राबवून सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला.

आमच्या कुटुंबातील बहुतेक सर्व सदस्य अनेक वर्षांपासून बीएसएनएल वापरत आहेत. पण, सध्या त्याचा उपयोग केवळ येणारे फोन उचलण्यासाठी केला जातो. दुसऱ्यांना फोन आणि इंटरनेटची सुविधा वापरण्यासाठी इतर कंपन्यांचे सीम कार्ड आम्ही वापरतो.
- अभिजित साळुंखे, ग्राहक

डिजिटल इंडियात ४ जी सेवा नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा मोठा गवगवा केला, परंतु मागील चार वर्षांपासून बीएसएनएल या सरकारी कंपनीची ४जी सेवा ते सुरू करू शकले नाहीत. डिजिटल इंडिया ही सरकारी कंपन्यांसाठी नसून केवळ खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे का? असा प्रश्‍न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

Web Title: BSNL 3G Internet Service