प्राचीन कलात्मक वस्तूंबाबत जागरूकता हवी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे - ""आपण अनेक जण हस्तिदंती मनोऱ्यात वावरतो. मोठमोठी भाषणे देतो; पण प्राचीन काळातील वस्तूंच्या जतन आणि संरक्षणासंदर्भात काही करतो का? याचे उत्तर नाही हेच आहे. समाजाच्याच नव्हे तर सरकारच्या पातळीवरही या संदर्भात जागरूकता वाढायला हवी. कारण प्राचीन काळातील मौल्यवान वस्तूंची तस्करी अजूनही सुरूच आहे'', असे स्पष्ट मत डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. अरविंद जामखेडकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. 

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ येथे "इंडियन आर्ट हिस्टरी कॉंग्रेस' यांच्या संयुक्त विद्यमाने "बौद्ध व जैन कला ः तत्त्वज्ञानाची पार्श्‍वभूमी व सामाजिक योगदान' या विषयावर तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजिण्यात आली आहे. याच्या उद्‌घाटन सोहळ्यात जामखेडकर बोलत होते. उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, अभ्यासक किरीट मनकोडी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वसंत शिंदे, "आयसीएचआर'चे अध्यक्ष सुदर्शन राव, "इंडियन आर्ट हिस्टरी कॉंग्रेस'चे अध्यक्ष डॉ. आर. डी. चौधरी उपस्थित होते. 

जामखेडकर म्हणाले, ""प्राचीन काळातील वस्तू पाहाव्यात तर ब्रिटिश संग्रहालयात, असे म्हटले जाते; पण आपल्याकडे इतका मोठा कलात्मक ठेवा असताना आपल्याकडची संग्रहालये फारशी सुसज्ज नाहीत. समाजाची अनास्था आणि सरकारची उदासीनता यामुळे आपल्याकडील प्राचीन काळातील मौल्यवान वस्तूंची कोट्यवधी रुपयांत बेकायदेशीरपणे विक्री होत आहे. हे रोखण्यासाठी नेमलेल्या पथकातील पदेही कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. यावरून आपल्या कला, संस्कृतीचा ठेवा असलेल्या पुरातन वस्तूंबाबत सरकारची भूमिका काय, हे लगेच कळते.'' 

अनास्था, उदासीनता टाळून या विषयाकडे आपण पाहायला हवे, असेही ते म्हणाले. फिरोदिया यांनी जैन तत्त्वज्ञानाची मांडणी केली तर मनकोडी यांनी भारतातील ठिकठिकाणचे शिल्प आणि त्यावरील कलाकुसर याची माहिती दिली. या परिषदेत ठिकठिकाणचे तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. विद्यापीठात शनिवारपर्यंत (ता. 3) सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळात ही परिषद सुरू राहणार आहे.

Web Title: Buddhist and Jain art 'conference