बिल्डरची तीन कोटींची फसवणूक

बिल्डरची तीन कोटींची फसवणूक

पुणे - चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाची तीन कोटी ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.  

नितीन अरविंद राशीनकर (रा. बेलविस्टा, येरवडा) याला अटक केली आहे, तर त्याचे साथीदार रणजित लोंढे, रोहन लोंढे (दोघे रा. कल्याणीनगर), उमेश कोकणे (रा. हिंदुस्थान सोसायटी, कल्याणीनगर, येरवडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बांधकाम व्यावसायिक संजय खोमणे (रा. मुंढवा) यांनी या संदर्भात येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

खोमणे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची संकेत असोसिएट्‌स नावाची बांधकाम व्यवसाय कंपनी आहे. राशीनकर निशी डेव्हलपर्सचा मालक आहे. शहरातील एका जमिनीचा २० कोटी रुपयांना व्यवहार होणार आहे. यात दीड कोटी रुपये गुंतवल्यास दोन कोटी रुपये नफा मिळवून देऊ, असे आमिष राशिनकरने फिर्यादी यांना दाखविले. त्यासाठी राशीनकर, लोंढे आणि कोकणे यांनी खासगी वित्तसंस्थेतून दीड कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देऊ, असे खोमणे यांना सांगितले. 

सिंहगड रस्ता भागातील खासगी वित्त संस्थेतून दीड कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर ती रक्कम खोमणे यांनी राशीनकरला दिली. मात्र, गुंतवणुकीबाबत विचारणा केल्यानंतर राशीनकरने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, राशिनकरने कल्याणीनगर भागातील एका मोटार विक्रेत्याकडून दोन महागड्या मोटारी विकत घेतल्या. राशीनकर, लोंढे आणि कोकणे यांच्याकडे गुंतवणुकीबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दिली. हे प्रकरण पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपविण्यात आले. दरम्यान, राशीनकर याची ११ मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com