महापालिकेच्या गोंधळात बांधकामे अर्धवट

महापालिकेच्या गोंधळात बांधकामे अर्धवट

पुणे - सहा ते नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यावर बांधकामांना परवानगी देण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या पातळीवरील गोंधळाचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसत आहे. नऊ मीटर रस्ता गृहीत धरून बांधकाम नकाशांना मंजुरी दिली जाते. परंतु त्याच बांधकामांवर विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) अथवा प्रीमिअम चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरण्यास परवानगी दिली जात नाही. या अजब धोरणामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे अर्धवट अवस्थेत आहेत. 

महापालिकेच्या हद्दीत १९९७ मध्ये २३ गावे समाविष्ट झाली. या गावांचा विकास आराखडा मंजूर होऊन दहा वर्षे झाली. ही गावे महापालिकेच्या हद्दीत येण्यापूर्वी तेथे मोठ्या प्रमाणावर गुंठेवारीची बांधकामे झाली. ही बांधकामे होताना अनेक ठिकाणी रस्ते नऊ मीटर रुंदीच्या आतच राहिले. गावांचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर या गावांमध्ये रस्ता रुंदीकरणासंदर्भात महापालिकेने धोरण ठरविले. सहा मीटर रुंदीचे रस्ते असलेल्या ठिकाणी बांधकामांना परवानगी देताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंस दीड मीटर अंतर सोडून बांधकाम परवानगी देण्याचा निर्णय झाला. जेणेकरून भविष्यात त्या ठिकाणचा रस्ता नऊ मीटर रुंदीचा होईल, असे ठरले. त्यानुसार सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव दाखल झाल्यानंतर नऊ मीटर रुंदीचा रस्ता आहे, असे गृहीत धरून बांधकाम परवानगी महापालिकेकडून दिली जाते.

अशा बांधकामांवर ‘टीडीआर’ अथवा प्रीमिअम ‘एफएसआय’ वापरून वाढीव बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव महापालिकेकडे दाखल केल्यानंतर त्यास मंजुरी दिली जात नाही. संपूर्ण रस्ता नऊ मीटर रुंदीचा नाही, असे कारण सांगून वाढीव बांधकाम करण्यास परवानगी नाकारली जाते. परिणामी, अशा प्रकारे शहरात अनेक बांधकामे रखडली आहे.  ‘आर्थिक’ तडजोडीनंतर ‘विशेष अधिकार’ वापरून वाढीव बांधकाम करण्यास परवानगी दिली जाते. परिणामी, कागदावर नऊ मीटर रुंदीचा रस्ता आणि प्रत्यक्षात जागेवर सहा मीटरचा रस्ता असे चित्र अनेक गावांमध्ये निर्माण झाले आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी देताना सहा ते नऊ मीटर रुंद रस्त्याचे जे धोरण महापालिकेने तयार केले आहे, ते त्वरित रद्द करावे, अशी मागणी होत आहे.

सहा ते नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यावरील बांधकाम परवानगी देतानाचे धोरण स्पष्ट असावे. रस्ते रुंद झाले पाहिजेत, त्यासाठी विकास आराखड्यात सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांचे नऊ मीटर रुंदीकरण दाखवावे. असे झाल्यास शहराचा विकास होईल आणि महापालिकेचे उत्पन्नही वाढेल.
जितेंद्र सावंत, अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना 

बावधन येथे साडेतीन गुंठे जागा आहे. त्यापुढील रस्ता ६ मीटर रुंद आहे. बांधकाम परवानगी देताना दीड मीटर अंतर सोडण्यास सांगून नऊ मीटर रुंद रस्ता गृहीत धरून बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार बांधकाम केले. संपूर्ण रस्ता नऊ मीटर रुंद नाही, असे कारण सांगून आता वाढीव बांधकाम करण्यासाठी ‘टीडीआर’ देत नाहीत. 
- राजीव फडके, रहिवासी, बावधन

रस्तारंदीकरणाबाबत धोरणात्मक स्पष्टता येण्यासाठी लवकरच प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com