मोशीत पदपथावरच बिल्डरांकडून कार्यालये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

मोशी - येथे चक्‍क पदपथावरच अनधिकृत बांधकाम सरू असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता. ४) निदर्शनास आला. मोशी-चिखली प्राधिकरणामधून जाणाऱ्या चिखली परिसरातील स्पाइन रस्त्याच्या सेवा रस्त्यालगतच्या पदपथावरच हे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. 

मोशी - येथे चक्‍क पदपथावरच अनधिकृत बांधकाम सरू असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता. ४) निदर्शनास आला. मोशी-चिखली प्राधिकरणामधून जाणाऱ्या चिखली परिसरातील स्पाइन रस्त्याच्या सेवा रस्त्यालगतच्या पदपथावरच हे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने पुणे-नाशिक महामार्ग ते पुणे-मुंबई या महामार्गांना जोडणारा स्पाइन रस्ता तयार केला आहे. पंचेचाळीस मीटर एवढी प्रशस्त रुंदी असणाऱ्या या रस्त्यामुळे शहराच्या सौंदर्यात वाढ झाली आहे. या रस्त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून मोशी, चिखली प्राधिकरणातील विविध पदपथांवर पथारीवाले, टपरीधारक, विक्रेते यांनी अतिक्रमण करून पदपथ गिळंकृत केले आहेत. त्यातच भर की काय, आता या रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनीही कार्यालये स्थापण्यासाठी चक्क येथील पदपथावरच दिवसाढवळ्या अनधिकृत बांधकामे करण्यास सुरवात केली आहे. सोमवारी (ता. ४) टाटा मोटर्स ते शाहू नगर या दरम्यानच्या स्पाइन रस्त्यालगतच्या पदपथावर दिवसा बांधकाम सुरू आहे. काहींनी या पदपथावर कार्यालयासाठी लोखंडी मोठ्या आकाराचे कंटेनरच आणून ठेवले आहेत. या कंटेनरमुळेही या पदपथावरून नागरिकांना चालणे अवघड झाले आहे. काही ठिकाणी पदपथावर विक्रीसाठी टायर, विविध वस्तूचे बॉक्‍स, फर्निचर आदी साहित्य ठेवले आहे. त्यामुळे चालायचे कोठून असा प्रश्‍न पादचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. या बांधकाम करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचकच राहिला नसल्यानेच असे प्रकार सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी कळविले आहे.

सदर बांधकामाची पाहणी करून त्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल.
- आबासाहेब ढवळे, प्रवक्ता, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, पिंपरी-चिंचवड पालिका

Web Title: Builders offices on the footpath in moshi