बंडगार्डन खुले दालन कलाकारांच्या प्रतीक्षेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

येरवडा - बंडगार्डन पुलावर दीड कोटी रुपये खर्च करून खुले कलादालन सुरू करण्यात आले आहे. मात्र पाच महिने लोटले तरी महापालिकेची उदासीनता आणि प्रसिद्धीच्या अभावामुळे या ठिकाणी अद्याप कलाकारांना कला प्रदर्शित करता आलेली नाही. बंडगार्डन पूल केवळ वॉकिंग प्लाझा म्हणून म्हणून उभा आहे. 

येरवडा - बंडगार्डन पुलावर दीड कोटी रुपये खर्च करून खुले कलादालन सुरू करण्यात आले आहे. मात्र पाच महिने लोटले तरी महापालिकेची उदासीनता आणि प्रसिद्धीच्या अभावामुळे या ठिकाणी अद्याप कलाकारांना कला प्रदर्शित करता आलेली नाही. बंडगार्डन पूल केवळ वॉकिंग प्लाझा म्हणून म्हणून उभा आहे. 

बंडगार्डन पुलावरील खुल्या कलादालनामुळे नवोदित कलाकारांना एक खुले व्यासपीठ मिळू शकेल. नागरिकांनाही कलांचा आस्वाद घेता येईल. येथे वैद्यकीय, योगा आदी विषयांचेसुद्धा नागरिकांना मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करता येईल, असा महापालिकेचा मानस आहे. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून प्रचार आणि प्रसिद्धीच्या अभावामुळे येथे कलाकार फिरकलेच नाहीत. 

पुणे महापालिकेने एक कोटी रुपये; तर खासदार वंदना चव्हाण यांनी खासदार निधीतून पन्नास लाख रुपये असे दीड कोटी रुपये खर्च करून बंडगार्डन पुलावर "आर्ट प्लाझा' विकसित केला आहे. आठशे फूट लांबीच्या पुलावर डेकोरेटिव्ह फ्लोअर पॅटर्न, बैठकव्यवस्था, डिस्प्ले वर्क, पाथ वे, फ्लॉवर बेड आदींची सोय करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या डिझाईनिंगसाठी भारती विद्यापीठाच्या वास्तुविशारद महाविद्यालयाची मदत घेण्यात आली. आर्ट प्लाझावर छायाचित्रांसाठी स्पॉट, कलाप्रदर्शन, आर्ट व क्राफ्ट मेळावे, फ्लॉवर शो, व्याख्याने, संगीत इत्यादी प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महापालिका पुरातत्त्व विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते. मात्र अद्याप एकही कार्यक्रम झालेला नाही. 

परदेशांत अनेक ठिकाणी मोकळ्या जागांवर कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी अशा प्रकारची खुली कलादालने आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने शहराच्या विविध भागांत होणारी चित्र, शिल्पप्रदर्शने, चौकांत होणारी पथनाट्ये, कार्यशाळा आणि स्क्रीनिंगसाठी "आर्ट प्लाझा'ची उभारणी केली आहे. 

Web Title: Bund Garden Open Gallery waiting for artists