
लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांनो सावधान, आपल्या घऱातील किंमती ऐवजाची काळजी घ्या..कारण कदमवाकवस्ती, कुंजीरवाडीसह उरुळी कांचन या लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात मागील काही दिवसांपासून घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे.
कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व उरुळी कांचन या तीन ग्रामपंचायत हद्दीत मागील सहा दिवसांच्या कालावधीत चोरट्यांनी दहाहून अधिक ठिकाणी हात मारल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्य़ा आहेत. यात कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एका सोनाराच्या दुकानांचाही समावेश आहे. दरम्यान ग्रामसुरक्षा दलांच्या स्थापनेमुळे चोऱ्या व घरफोड्या कमी होतील हा पोलिसांचा दावाही, मागील सहा दिवसांतील घरफोड्यांमुळे फोल ठरला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गालगत कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रशांत मच्छिंद्र चोरघे (वय २४, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांच्या मालकीच्या दुकानाचे शहर उचकटून अज्ञातांनी, रविवारी (ता. १८) मध्यरात्री एक लाख चाळीस हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. प्रशांत चोरघे यांच्या दुकानात हात साफ करण्यापुर्वी, चोरट्यांनी उरुळी कांचन परीसरातील तीन वेगवेगळी दुकाने फोडली होती. या तीनही दुकानातील जादा ऐवज चोरीस गेला नसला तरी, चोरट्यांनी दुकानाचे नुकसान मात्र केल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, उरुळी कांचन व कुंजीरवाडी हद्दीतील घटनांच्या दोन दिवस अगोदर, चोरट्यांनी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील चार दुकानाचे शहर उचकटून चोरी करण्याचे प्रयत्न केल्याच्या तक्रारी लोणी काळभोर पोलिसांत दाखल झालेल्या आहेत. चोरट्यांनी कवडी-माळवाडी परीसरातील एका किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. या दुकानातील सात हजार रुपये रोख रक्कम व तुपाचे काही डबे घेऊन चोरटे पसार झाले. तर किराणा दुकानात येण्यापुर्वी चोरट्यांनी माळवाडी येथील एक मेडीकल दुकान व किराणा दुकानही फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सिसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. तर कवडी-माळवाडी परीसरातील किराणा दुकानात चोरी केल्यानंतर, चोरट्यांनी फुरसुंगी फाट्यासमोरील मोरया या कपड्याच्या दुकानाचे शटर उचकावट्याचा प्रयत्न केला. मात्र शटर मजबूत असल्याने, मोरया दुकान लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न असफल झाला आहे.
पाच मोठ्या घरफोड्या अद्याप अनडिटेक्टच...लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत मागील दोन वर्षांच्या काळाच घडलेल्या तब्बल पाच मोठ्या घरफोड्या अद्यापही उघडकीस आल्या नसल्याचे दिसून आले आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परीसरातील संगीता शशिकांत साबळे यांच्या घराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी पंच्चावन्न तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या घटनेस दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. याबाबतची तक्रार दाखल होऊनही, चोरटे हाती लागू शकलेले नाहीत. तर मागील सहा महिण्यांच्या काळात लोणी काळभोर गावातील खोकलाई देवी चौकातील एकाच इमारतीमधील तीन वेगवेगळ्या फ्लॅटचे दरवाजे उचकटून चोरट्यांनी मोठे हात मारले होते. तर याच चौकातील एका घराचे दरवाजा उचकटून चोरट्यांनी पंधरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचीही तक्रार पोलिसांत दाखल आहे. या पाचही घरफोड्या मोठ्या असूनही, पोलिस अद्याप चोरट्यांपर्यंत पोहचू शकलेले नाहीत.
चोरटे तीनच, वाहने् मात्र वेगवेगळी....कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व उरुळी कांचन या तीन ग्रामपंचायत हद्दीत मागील सहा दिवसांच्या कालावधीत चोरट्यांनी हात साफ कऱण्याचा प्रयत्न केलेल्या दहाही ठिकाणचे सिसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले आहे. यात तीन जण दुकान फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व उरुळी कांचन हद्दीत चोरी करताना चोरटे तीन असले तरी, तीनही गावात चोरी करताना चोरट्या्ंनी वाहन मात्र वेगवेगळी वापरल्याचे सिसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
'तपास अंतिम टप्प्यात'- लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने बोलताना वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, ''कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व उरुळी कांचन या तीन ग्रामपंचायत हद्दीत मागील सहा दिवसांच्या कालावधीत घडलेल्या घरफोड्याचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. यापुढील काळात घऱफोड्या होऊ नयेत यासाठी ग्रामसुरक्षा दलांतील युवकांच्या समवेत पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. यापुर्वीच्या घरफोड्यांवर तपास सुरू असून, पुढील काही दिवसांत चोरटे गजाआड दिसतील.''
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.