बस आल्या; पण बीआरटी दूरच

मंगेश कोळपकर
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे - बीआरटी मार्ग तयार झाला तेव्हा बस नव्हत्या; आता नव्या बस आल्या तर, बीआरटी मार्गाचे काम पूर्ण व्हायला किमान सहा महिने लागणार. त्यामुळे सातारा रस्त्यावरील प्रवाशांच्या मागे लागलेले शुक्‍लकाष्ठ सुटण्याची सुतराम शक्‍यता नाही.

पुणे - बीआरटी मार्ग तयार झाला तेव्हा बस नव्हत्या; आता नव्या बस आल्या तर, बीआरटी मार्गाचे काम पूर्ण व्हायला किमान सहा महिने लागणार. त्यामुळे सातारा रस्त्यावरील प्रवाशांच्या मागे लागलेले शुक्‍लकाष्ठ सुटण्याची सुतराम शक्‍यता नाही.

सातारा रस्त्याच्या पुनर्रचनेचे काम सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू झाले. त्यासाठी सुमारे ८० कोटी रुपये महापालिकेने खर्च केले आहेत. त्यात बीआरटीही सुधारित पद्धतीने उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. गेल्यावर्षी डिसेंबरअखेर रस्ता पुनर्रचनेचे आणि बीआरटीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु ते काम लांबले. दरम्यानच्या काळात या रस्त्यावरील बीआरटी बंद करण्यात आली. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर बीआरटीचे स्थानकांच्या कामाला वेग येईल, असे वाटत होते. तेव्हा पीएमपीने बस उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे स्थानकांचे काम रखडले ते रखडलेच. याबाबत महापालिकेकडे विचारणा केली तर, बीआरटीचे काम पूर्ण होण्यास आणखी सहा ते आठ महिने विलंब लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

असे होणार पुढचे काम 
मार्केट यार्ड ते जेधे चौक दरम्यान बीआरटीच्या तीन स्थानकांची आणि पूरक सुविधांची उभारणी अद्याप व्हायची आहे. त्यासाठी महापालिकेने २७ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. त्याला स्थायी समितीमध्ये मंजुरी मिळाली तर, संबंधित ठेकेदाराला कार्यआदेश (वर्कऑर्डर) देण्यात येतील. त्यानंतर स्थानके उभारण्यासाठी त्याला ९ महिन्यांची मुदत दिली जाईल.

अशा आल्या आहेत बस 
पीएमपीच्या ताफ्यात ३१ बस सध्या आल्या आहेत. महिना अखेरीस आणखी २७ बस येणार आहेत. तर दोन महिन्यांत १२५ बस दाखल होतील. पाठोपाठ ४०० बस येतील. या सर्व बस बीआरटी मार्गावर धावू शकतील, अशी त्यांची रचना आहे. 

बीआरटीच्या नव्या मार्गांचे काय?
  बीआरटीचे ११० किलोमीटरचे मार्ग शहरात सुरू करण्याचा महापालिकेचा ठराव 
  सातारा रस्ता- सोलापूर रस्त्यावरील बीआरटी सध्या बंद
  मेट्रोच्या कामामुळे नगर रस्त्यावरील बीआरटी बंद 
  फक्त विश्रांतवाडी बीआरटी अंशतः सुरू 

स्थानकांच्या निविदांना मंजुरी मिळाल्यावर लगेचच बीआरटीचे काम सुरू होईल. ते पूर्ण करण्याची मुदत ९ महिने असली तरी, आम्ही ६ महिन्यांत पूर्ण करू. बीआरटीची उर्वरित कामेही लवकर पूर्ण करून हा मार्ग पीएमपीच्या ताब्यात देऊ. 
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, महापालिका

सातारा रस्ता बीआरटीची नेमकी मुदत काय? शहरातील अन्य बीआरटी मार्गांसाठी कालमर्यादा किती असेल, हे महापालिकेने स्पष्ट करावे, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत; परंतु त्याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
- रणजित गाडगीळ, महापालिकेच्या बीआरटी समितीचे सदस्य

सातारा रस्त्यावरून
४४ बसमार्ग
३९१२ बसच्या रोजच्या फेऱ्या
२ लाख ५४ हजार प्रवाशांची रोजची वाहतूक 

Web Title: Bus BRT Route Satara Road