...अन् झोपेत असतानाच बस दरीत कोसळली! 

...अन् झोपेत असतानाच बस दरीत कोसळली! 

पिंपरी (पुणे) : पहाटे साडेचारची वेळ...बसमधील सर्व जण झोपलेले... रस्त्यावरील एका वळणावर थोडा झटका बसल्याचे जाणवले व काही कळायच्या आत बस दरीत कोसळली. अंधार असल्याने काय झाले काहीच कळेना. मागील सीटवरील प्रवासी पुढे येऊन आदळले. काही जण खिडकीतून बाहेर पडले. जखमींचा प्रचंड आक्रोश सुरू झाला. दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून बचावलो. अंगावर शहारा आणणारा प्रसंग खंडाळा येथील बोरघाटात झालेल्या बस अपघातातील जखमी सागर शिवाजी सिंगान यांनी कथन केला. 

सागर म्हणाले, "मुंबईत नोकरीला असून कराड तालुक्‍यातील कोळे या मूळ गावी दिवाळीसाठी आलो होतो. दिवाळी झाल्याने रविवारी (ता. 3) रात्री साडेदहाच्या सुमारास खासगी बसने कुटुंबीयांसह मुंबईकडे निघालो. बहुतांश प्रवासी कराड परिसरातीलच होते. मी पंधरा क्रमांकाच्या सीटवर बसलो होतो. सोमवारी (ता. 4) पहाटे साडेचारच्या सुमारास बोरघाटातील गारमाळ येथील वळणावर सुरवातीला बसला थोडा झटका बसला.

त्यानंतर बस रस्ता सोडून घाटात कोसळली. सर्वत्र अंधार आणि सर्व जण झोपेत होते. काय झाले कोणालाच काही समजेना. कोसळत असताना बस कलल्याने मागील सीटवरील प्रवासी पुढे येऊन आदळले. यामुळे अनेकांना गंभीर इजा झाली. अनेक जण जीव वाचविण्यासाठी बसच्या बाहेर पडू लागले. मीदेखील खिडकीतूनच बाहेर पडलो. तोंडाला, कानाला इजा झाल्याने रक्तस्राव सुरू होता. तरीही नातेवाइकांसह इतर प्रवाशांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दैव बलवत्तर म्हणून माझ्यासह माझे नातेवाईक बचावले.'' 

काळजी अन्‌ धाकधूक 
अपघाताची माहिती मिळताच मूळ गावाकडील, तसेच मुंबईकडील नातेवाइकांसह मित्रमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णांची प्रकृतीची माहिती घेण्यासाठी धडपड सुरू होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्या रुग्णाबाबत काळजी आणि मनात धाकधूक होती. 

जखमींची नावे 
निगडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल : सागर शिवाजी सिंगान, शुभांगी शेळके, फाहीम अन्सारी, पल्लवी हरपळे, गणेश खाडे, सविता बेलदार, स्वप्नील तुळे, शिवम जाबाळे, भक्ती हरपडे, प्रतीक पाटील, अविनाश यादव, रमेश देसाई, शुभांगी साळुंके, भगत सत्पाल, सागर सकपाळ, जयप्रकाश घारे, अमर सुपागडे, मोहन कदम, कांचन देसाई, संजय पवार, अजय गायकवाड, भास्कर जाधव, कृष्णा प्रकाश मदने, जय साळुंके, सुहास शिंदे, ओंकार साळुंके, हर्षल पारेख, संतोष मोहोत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com