सीएनजीसाठी गाड्यांची रांग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

  • सुमारे साडेतीन एकरवर हे आगार वसले आहे. तब्बल १५९ बसगाड्या असल्याने आगाराची जागा अपुरी पडत असून समोरील पालिकेच्या मालकीच्या दीड एकर जागेवर गाड्या उभ्या कराव्या लागत आहेत. याखेरीज, रात्री काही गाड्या रस्त्यावरही उभ्या कराव्या लागतात. 
  • कायम आणि रोजंदारीवरील असे एकूण ३२५ वाहक आणि २५७ चालक काम करत आहेत.  
  • कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नतीही रखडली आहे.   
  • डिझेल गाड्या इंधन भरण्यासाठी भोसरी आगाराकडे पाठवाव्या लागतात.

पिंपरी - पीएमपीच्या संत तुकारामनगर आगाराला एमएनजीएलकडून सीएनजीचा कमी दाबाने होत असलेला पुरवठा आणि ४० चालकांची कमतरता, यामुळे दैनंदिन बससेवेवर विपरीत परिणाम होत आहे. सीएनजी भरण्यासाठी आगारात रात्रभर रांगेत उभ्या कराव्या लागत आहेत.  

आगारामधून दररोज २३ मार्गांवर बसगाड्या धावतात. आगाराकडे १३९ सीएनजी, २० डिझेल अशा एकूण १५९ बसगाड्या आहेत. त्यापैकी ४० बसगाड्या आरटीओ पासिंग, इंजिन दुरुस्ती यासारख्या कारणांनी बंद ठेवाव्या लागत आहेत. नवीन बसगाड्या ताफ्यात दाखल झाल्याने ब्रेकडाऊनचे प्रमाण घटले असले तरी प्रतिदिन सरासरी चार गाड्या मार्गावर कमी धावत आहेत.

या आगारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी ठेकेदाराकडे असलेल्या ६४ सीएनजी गाड्या संत तुकारामनगर आगाराकडे वर्ग केल्या. मात्र, संबंधित ठेकेदाराने त्यांची वेळेवर देखभाल-दुरुस्ती न केल्याने त्यातील १४ गाड्या पूर्णपणे बाद झाल्या आहेत. तर आणखी १५ ते २० सीएनजी गाड्या बाद होण्याच्या मार्गावर आहेत. आगारातील १०० गाड्या, भोसरी आगारातील ५१ गाड्या येथे सीएनजी भरण्यासाठी येतात. आगारातील ४० टक्के गाड्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांना दुपारी सीएनजी भरण्यासाठी पुन्हा आगारात यावे लागते. सध्या आगारात सीएनजी भरण्यासाठी दोन पंप आणि दोन कॉम्प्रेसर आहेत. त्यामुळे सीएनजी भरण्यासाठी प्रत्येक गाडीला सरासरी आठ मिनिटांऐवजी १६ मिनिटांचा वेळ लागत आहे. रात्री आठ वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत १५० गाड्या लांब रांगेत उभ्या असतात. या आगाराला जादा दोन सीएनजी पंप आणि दोन कॉम्प्रेसरची गरज आहे. 

कार्यशाळेत १०८ कर्मचारी असून बहुतेक कर्मचारी हे पूर्वी डिझेल बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी नेमण्यात आला होता. ‘सीएनजी’ गाड्यांच्या देखभालीसाठी आवश्‍यक ३० ते ४० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीही उणीव भासते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bus line for CNG in sant tukaramnagar depo