व्यवसाय ठप्प झाला अन् कुटुंबाची गती खुंटली

अजमेरा कॉलनी, पिंपरी - हातगाडीवर फळे आणि भाजीपाला विकणाऱ्या जयश्री शिंदे.
अजमेरा कॉलनी, पिंपरी - हातगाडीवर फळे आणि भाजीपाला विकणाऱ्या जयश्री शिंदे.

पुणे - कोरोनाच्या महामारीने होत्याचे नव्हते झाले. बंगल्यातील माणसापासून रस्त्यावरच्या व्यावसायिकापर्यंत सगळ्यांनाच चटके बसताहेत. त्यात पथारी व्यावसायिकांसारख्या हातावर पोट असलेल्यांची स्थिती तर फारच कठीण झाली आहे. व्यवसायाची चाके थांबली अन् कुटुंबाची गती खुंटली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोखलेनगर मध्ये एकटी राहणारी सविता तरडे... शुगर, बीपी, मणक्‍याचा त्रास, अशा अनेक आजारांनी ग्रस्त... विद्यापीठ चौकात उकडलेली अंडी आणि आम्लेटची हातगाडी लावते. दररोजचा नफा दीडशे ते दोनशे. गेल्या दोन महिन्यांपासून गाडी बंद आहे. कमाई बंद आहे, पण खर्च सुरू आहे. डोक्‍यावर कर्ज झाले.

सदाशिव पेठेतील संदीप यादव.. नऊ जणांचे कुटुंब.. संदीप साबुदाणा वड्याची गाडी लावतो, मोठा भाऊ रिक्षा चालवतो.. तर लहान भावाची सरबताची गाडी..  अपघात झाल्याने गेले वर्षभर त्याची गाडी बंद आहे. त्यामुळे दीपक आणि मोठा भाई पप्पू या दोघांवर घराची जबाबदारी येऊन पडलेली. लहान भावाच्या उपचारावर नुकताच मोठा खर्च झाला. त्यातून सावरत नाही, तोच लॉकडाऊन. रिक्षा बंद आणि साबुदाण्याची गाडीही बंद .. मात्र औषधांचा आणि दररोजच्या खाण्यापिण्याचा खर्च सुरूच आहे.. दिवसरात्र कष्ट करून जी काही शिल्लक राहिली होती, तीही या दोन महिन्यांच्या कालावधीत संपून गेली. 

ही आहेत शहरातील काही प्रातिनिधिक पथारी व्यावसायिकांची उदाहरणे. कधी महापालिकेच्या कारवाईत गाडी उचलली जाते. पोलिसांचे, माननीयांचे, मंडळांच्या कार्यकर्त्यांना हप्ते चुकत नाहीत. फुकट येऊन खाऊन जाणारे वेगळेच. जेमतेम वीस ते बावीस दिवस धंदा झाल्यानंतर महिन्याला आठ ते दहा हजार रुपये हातात पडतात. त्यातही दुखणे आले, तर मग कोणाकडे तरी हात पसरायचा, अशीच अनेकांची स्थिती. 

लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक फटका बसला तो या घटकांना. रडतखडत का होईना यांची सुरू असलेली जीवनाची गाडी, आज ठप्प झाली आहे.

या मदतीने पोट भरेल; पण बाकी काय?
व्यवसाय उभे करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे पुण्यातील १८ हजारांपेक्षा अधिक अधिकृत फेरीवाल्यांना लाभ मिळेल. या घटकाला दिलेली क्रेडिट सुविधा अपुरी असली तरी किमान व्यवसाय सुरू करता येणार असल्याने पोट भरता येईल, पण मुलांचे शिक्षण, आरोग्य, कर यांचे काय करायचे ? असा प्रश्‍न फेरीवाल्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरीता केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी पाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातून फेरीवाल्यांना आपल्या उद्योग-व्यवसायासाठी १० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. त्याअनुषंगाने पुण्यातील फेरीवाल्यांना नेमका किती, कसा फायदा होईल, याबाबत त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांशी चर्चा केली. गेल्या दोन महिन्यातील लॉकडाउनमध्ये पथारी व्यावसायिक प्रचंड अडचणीत आला आहे. त्यातच लॉकडाउन वाढत असल्याने आता जगायचे कसे, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे आहे.

पुण्यातील पथारी व्यावसायिक 
४८ हजार अनधिकृत 
१८,२२५ अधिकृत 
६ हजार पुनर्वसन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com