आता बारामतीतच होणार कोरोनाची तपासणी; टेस्ट लॅबला केंद्र सरकारचा हिरवा कंदील

मिलिंद संगई
Friday, 15 May 2020

कोरोनाच्या तपासणीच्या दृष्टीने बारामती व पंचक्रोशीतील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची तपासणी प्रयोगशाळा बारामतीत सुरू झाली आहे.

बारामती (पुणे) : कोरोनाच्या तपासणीच्या दृष्टीने बारामती आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची तपासणी प्रयोगशाळा बारामतीत सुरू झाली आहे.

शिरूरकरांची चिंता वाढली...उद्यापासून पाच दिवस "जनता कर्फ्यू'  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या तपासणीची प्रयोगशाळा व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू होता.

पुण्याच्या प्रयोगशाळांवर असलेला कमालीचा ताण कमी करून तातडीने अहवाल प्राप्त करण्यासाठी पुण्यासह जिल्ह्यात एका ठिकाणी अशी प्रयोगशाळा उभारणे गरजेचे होते. त्यातून बारामतीच्या प्रयोगशाळेस केंद्र शासनानेही परवानगी दिली आहे. 

बारामतीत न्यायमंदिरासमोर पोलिस व वकील यांच्यातच...   

याबाबत बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे म्हणाले की, बारामतीत दोन प्रणालीद्वारे तपासणी केली जाणार आहे. "सीबीनॅट' या मशिनद्वारे शुक्रवारपासून या तपासणीस प्रारंभ झाला असून, येत्या सात दिवसात "आरटीपीसीआर' मशिनद्वारे तपासणी होणार आहे. त्यात घशातील द्रावाचा नमुने तपासले जाणार असून, दोन तासात त्याचा अहवाल लगेचच प्राप्त होणार आहे.

- आता आमदार-खासदारांना दररोज मिळणार पुण्यातील कोरोनाचे अपडेट्स!

यात "सीबीनॅट' मशिनवर रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्याची पुन्हा "आरटीपीसीआर' मशिनद्वारे तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी इतके दिवस पुण्याला द्रावाचे नमुने पाठवावे लागत होते. आता बारामतीतच तपासणी होणार आहे. या मशिनसाठी राज्य सरकारने सव्वा कोटी रुपयांचे अनुदान देऊ केले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या प्रयोगशाळेसाठी विशेष मदत केली.

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा सुरू झाल्याने केवळ बारामतीच नाही, तर आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी शक्‍य होणार आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रयोगशाळांवरील ताणही कमी होणार आहे. बारामतीकरांसाठी ही मोठी सोय झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laboratory started in Baramati for corona testing