व्यावसायिक वाहनांसाठीही ‘एअर सस्पेंशन’

ARAI
ARAI

पुणे - क्षमतेपेक्षा जास्त माल भरून जाणारे वाहन रस्त्यावर अक्षरशः मोडून पडल्याचे चित्र आपण अनेकवेळा पाहतो. कधी त्याचा पाटा तुटलेला असतो, तर कधी पुढची दोन चाके उचलली जातात. हे चित्र बदलण्यासाठी ‘एअर सस्पेंशन’ हा प्रभावी उपाय असल्याचे संशोधन ‘ऑटोमिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एआरएआय) केले आहे. 

‘एअर सस्पेंशन’चे तंत्रज्ञान प्रवासी बसमध्ये वापरले जाते. ते व्यावसायिक वाहनांमध्ये करता येईल का, असा विचार पुढे आला. त्याच आधारावर  संशोधन सुरू झाले. व्यावसायिक कारणांसाठी वापर होणाऱ्या वाहनातील सस्पेंशनचा बारकाईने अभ्यास केला. मालवाहतूक करताना आणि वाहन रिकामे असताना अशा दोन्ही वेळी वाहनाच्या कोणत्या भागावर किती ताण येतो, हा अभ्यास यातून झाला, अशी माहिती ‘एआरएआय’मधील उपसरव्यवस्थापक योगेश ढगे यांनी ‘सकाळ’ला दिली.

मालवाहतूक करणाऱ्या छोट्या वाहनांचे आयुर्मान वाढविण्यासाठी आणि ते चालवत असताना त्याला स्थिरता देण्यासाठी ‘एअर सस्पेंशन’ हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांवर केलेल्या प्रयोगांना यश आले. 
- पी. आर. पवार, सरव्यवस्थापक, एआरएआय

असा केला प्रयोग 
वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर चालणाऱ्या या वाहनांची आणि त्यातील मालाची सुरक्षिततेसाठी त्याला सेन्सर बसविण्यात आले. ‘एअर सस्पेंशन’चा वापर केल्यानंतर वाहनाच्या ‘रोड क्‍लिअरन्स’मध्ये फरक पडत नाही.  त्यातील सेन्सर आणि एअर सस्पेंशन यातील समन्वयामुळे दाबाचे व्यवस्थापन होते. 

प्रयोगाचा निष्कर्ष 
सर्वाधिक दाब हा वाहनाच्या चासीवर येतो. चासीवर येणारा हा दाब रस्त्यामधून वाहनाच्या टायरमध्ये जातो. त्यातून हा दाब ॲक्‍सलला जाऊन पुढे सस्पेंशनला आणि शेवटी तो पुन्हा चासीवर येतो. मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या सस्पेंशनच्या मर्यादा दूर करण्यासाठी ‘एअर सस्पेंशन’चा वापरण्याचा प्रयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे मालाची सुरक्षित वाहतूक करता येईल, असा निष्कर्ष यातून निघाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com