esakal | उद्योगांची अडवणूक; पोलिसांकडून त्रास होत असल्‍याची तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Police

उद्योगांची अडवणूक; पोलिसांकडून त्रास होत असल्‍याची तक्रार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - उद्योगांमधील कामगारांची नियमितपणे अँटिजेन चाचणी केली तरी आता चालणार आहे. मात्र, कोरोनाची लक्षणे असलेल्या कामगारांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करावी लागणार आहे. दरम्यान, अँटिजेन चाचण्यांचे किट मोठ्या संख्येने उपलब्ध व्हावेत, यासाठी उद्योग विभागानेही प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्य सरकारने सुरवातीला कामगारांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्याचे बंधन घातले होते. मात्र, मोठ्या संख्येने कामगार असलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी जिल्ह्यांत ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्याची आरोग्य विभाग किंवा खासगी क्षेत्राची क्षमता नसल्याचे उघड झाले, तसेच कामगारांची नियमितपणे चाचणी कशी करणार, या बद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत राज्यातील बहुसंख्य उद्योग संघटनांनी ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची नसावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अँटिजेन चाचणीचा पर्याय उद्योगांना दिला आहे. तसेच, ४५ वर्षांवरील कामगारांचे लसीकरण तातडीने करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार शहर आणि परिसरातील अनेक उद्योगांनी कामगारांची अँटिजेन चाचणी करण्यास सुरवात केली असली, तरी त्याचे किट पुरेशा संख्येने उपलब्ध होत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

हेही वाचा: पुणेकरांसाठी दिलासादायक; जिल्ह्यात आठ दिवसांपासून सक्रिय कोरोना रुग्णसंख्या स्थिर

घरेलू कामगार, चालक आदींना राज्य सरकारने ‘आरटीपीसीआर’ चाचणीतून वगळले आहे. मात्र, कामगारांसाठी आदेश निघालेला नाही. उद्योग संघटनांबरोबर १४ एप्रिलला झालेल्या बैठकीत वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी मात्र ‘आरटीपीसीआर’ चाचणीऐवजी अँटिजेन चाचणी केली तरी चालेल, असे सांगत आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश आदींचा समावेश होता. त्यानंतरही पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र, पोलिस उद्योगांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अँटिजेन चाचणी दर किती दिवसांनी करायची, हेही राज्य सरकारने स्पष्ट केले नाही. तसेच ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी ५०० रुपये तर अँटिजेन चाचणीसाठी १५० रुपये शुल्क राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडसह बहुतेक ठिकाणी लॅबचालक त्याचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे.

सुमारे २६ हजार उत्पादन क्षेत्रातील पुणे परिसरातील उद्योग

सुमारे ४ लाख कामगारांची संख्या

हेही वाचा: पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी तीन हजार २४८ रेमडेसिव्हीर; ऑक्सिजनच्याही मागणीत वाढ

चेंबरने उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत कामगारांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीची सक्ती नसेल, असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या कामगारांनी मात्र ‘आरटीपीसीआर’ची चाचणी करणे बंधनकारक असेल.

- सुधीर मेहता, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंड्स्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर

कोरोनाची लक्षणे असलेल्या कामगारांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करणे योग्य आहे. परंतु, सरसकट कामगारांची चाचणी करणे अवघड आहे. आमची इच्छा असली तरी त्यासाठीचा सेटअप उपलब्ध नाही. तसेच रिपोर्टही लगेच मिळत नाही. हे प्रशासन, पोलिसांनी लक्षात घ्यावे आणि सुरू असलेल्या उद्योगांना त्रास देऊ नये.

- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

अनेक कंपन्या, कारखान्यांत अँटिजेन चाचणी सुरू झाली आहे. अँटिजेन चाचण्यांचे किट उद्योगांना उपलब्ध व्हावे, यासाठी आमच्या विभागाचाही प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

- सदाशिव सुरवसे, विभागीय सहसंचालक, उद्योग विभाग

चाचणी कोठे करायची, त्याचा रिपोर्ट कधी मिळणार, त्याचा खर्च आदी अनेक प्रश्न उद्‌भवले आहेत. लक्षणे असलेल्या कामगारांची चाचणी केली जातेच. परंतु, चाचणीच्या नावाखाली सुरू असलेल्या उद्योगांना आडकाठी करू नये.

- अशोक भगत, लघु उद्योजक

loading image