कॅब प्रवाशांना भुर्दंड

Cab-Issue
Cab-Issue

पुणे - विमानतळ किंवा रेल्वे स्थानकात जाण्यासाठी किंवा स्थानकापासून कॅब करत आहात... तर एकदा तुमचे बिल चेक करा. कारण त्यासाठी एका फेरीला किमान ३० ते ४५ रुपये जादा आकारले जातात. अन्‌ त्याला नाव दिले जाते ते ‘एअरपोर्ट पिकअप चार्जेस’. अनेक प्रवाशांमध्ये या सरचार्जबद्दल जागरूकता नसल्यामुळे कॅब प्रवास अप्रत्यक्षरीत्या महागला आहे. 

घरातून विमानतळावर प्रवासी पोचल्यावर त्याला सरचार्ज लागल्याचे बिलात दिसते. तसेच विमानतळाच्या आवारातून घरापर्यंत जाण्यासाठी कॅब केल्यावरही हा सरचार्ज लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना भुर्दंड पडू लागला आहे. तो केवळ विमानतळासाठी नाही, तर रेल्वे स्थानकासाठीही आहे.

कारण एका कॅब कंपनीने पुणे रेल्वे स्थानकावर स्टॅंड मिळावा म्हणून भारतीय रेल्वे बोर्डाला सुमारे ७२ लाख रुपये वर्षासाठी निविदा प्रक्रियेद्वारे चुकविले आहेत. म्हणून त्या कंपनीच्या सुमारे २०-२५ मोटारींसाठी रेल्वे स्थानकावर स्टॅंड देण्यात आला आहे, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना नमूद केले. पुणे विमानतळाला ओला-उबरकडून दरमहा सुमारे ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळेच त्यांना विमानतळाच्या आवारात स्टॅंडसाठी जागा दिली आहे, असे पुणे विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी सांगितले. 

कंपन्या म्हणतात देशभर हीच पद्धत 
या बाबत ओला, उबरच्या स्थानिक सूत्रांकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले, की प्रवाशांना रेल्वे स्थानक, विमानतळाच्या आवारात थेट सोडण्यासाठी कंपनीने पैसे भरून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्याचे माफक शुल्क प्रवाशांकडून आकारले जाते. या सुविधेमुळे प्रवाशांना थेट प्रवेश मिळतो आणि त्यांचाही वेळ वाचतो. केवळ पुण्यातच नव्हे, तर देशातील प्रमुख शहरांतही अशीच पद्धत आहे. 

सुजित शिळीमकर (नियमित प्रवासी) 
एकीककडे विमान प्रवास स्वस्त होत असताना शहरांतर्गत वाहतूक महाग होत आहे, त्याचे हे उदाहरण आहे. प्रवाशांच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने छुपी भाडेवाढ लादली जात आहे. विमानतळ, रेल्वे आवारात येण्यासाठी आणि जाण्यासाठी लादला जाणारा सरचार्ज रद्द केला पाहिजे. 

रेश्‍मा भोगले (नियमित प्रवासी) 
विमानतळाच्या आवारातून पिकअप ड्रॉप नव्हे, तर पार्किंग चार्जही कॅब कंपन्या आकारत आहेत. प्रवाशांना सुविधा देण्याच्या नावाखाली ही नफेखोरी आहे. विमान प्रवास, कॅब या अत्यावश्‍यक सेवा होऊ लागल्या असताना, ही छुपी दरवाढ अन्यायकारक आहे. अन्य शहरांतही असाच अनुभव येत आहे. 

सौरभ आगाशे (नियमित प्रवासी) 
प्रवाशांना सेवा देण्याच्या नावाखाली कॅब कंपन्या- संबंधित संस्थांचा थेट व्यवहार होत आहे. मात्र त्याचा भुर्दंड प्रवाशांना बसत आहे, हे योग्य नाही. तसेच अनेक प्रवाशांना याची माहितीही नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com