California : कॅलिफोर्नियात फुलणार विठ्ठल भक्तीचा मळा!

कॅलिफोर्नियात ‘इंद्रायणी काठी’चे २७ ऑगस्टला आयोजन; गायन, वादन, नृत्याचा नजराणा
Indrayani Kathi event
Indrayani Kathi eventsakal

पुणे - वारकरी संस्कृतीचे दर्शन, सकारात्मक विचारांचे मंथन, आत्मिक प्रेमाचा ओलावा, भक्तिप्रेमाचा झरा हे सारे आपल्याला पंढरीच्या वारीत अनुभवायला मिळते. मात्र, सातासमुद्रापार म्हणजे कॅलिफोर्नियामधील बे एरियामध्ये वारीचा हाच अनोखा सोहळा २७ ऑगस्ट रोजी रंगणार आहे.

‘इंद्रायणी काठी’ या कार्यक्रमाद्वारे कॅलिफोर्नियातील भाविक पंढरी सहवासाचा आत्मिक आनंद घेणार आहेत. या विशेष कार्यक्रमातून विठ्ठलभक्तीचा मळा फुलणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुमाउली म्हणजे प्रत्येक मराठी हृदयाचे स्पंदन, मग हा मराठी माणूस सातासमुद्रापार असला तरी अपवाद राहत नाही. कॅलिफोर्निया बे एरियातील उत्साही भाविकांनी विठ्ठल भक्तीचा अनुभव वारीमध्ये सहभागी होऊन घेतला.

बारा वारकऱ्यांनी आळंदी ते पंढरपूर निष्ठेने वारी केली. त्यामध्ये पाच महिलांचा आणि सात पुरुषांचा समावेश होता. ही वारी बे एरियातून थेट पंढरपूरपर्यंत पोचली. महाराष्ट्र मंडळ बे एरियातर्फे स्थानिक वारीचेही आयोजन केले होते. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

या सोहळ्याची सांगता या वर्षी मुद्रा परफॉर्मिंग आर्टच्या सहयोगाने सादर होणाऱ्या ‘इंद्रायणी काठी’ या अनोख्या कार्यक्रमाने होणार आहे. सॅन होजे येथील अद्ययावत हॅमर थिएटरमध्ये वारीवर आधारित नृत्य, गायन आणि नाटक अशा त्रिवेणी संगमाचे दर्शन वैष्णवांना घडणार आहे.

या कार्यक्रमात शास्त्रीय व उपशास्त्रीय तसेच लोककलेवर आधारित नृत्य आणि गायन यांची गुंफण लोकनाट्याने घालण्यात आली आहे. कार्यक्रमाची मूळ संकल्पना आणि दिग्दर्शन मुद्रा परफॉर्मिंग आर्ट्सच्या संचालिका, कथक नृत्यांगना मोनिका मुटाटकर यांनी केले आहे. पन्नासहून अधिक स्थानिक कलाकारांचा त्यात सहभाग असणार आहे.

यानिमित्ताने विठ्ठलभक्तीची अनोखी पर्वणी येथील भाविकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोनिका मुटाटकर या बे एरियात वीस वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी सिनेमा १००, नटरंग तसेच २०२३ मध्ये ‘दुर्गा झाली गौरी’ अशा कार्यक्रमांची निर्मिती केली आहे.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

  • मोनिका मुटाटकर, हेमाली गोंधळेकर आणि राधिका अधिकारी यांचे नृत्यदिग्दर्शन

  • संजय पाचपांडे यांनी पेलली नाटकाची जबाबदारी

  • दहा वर्षांपासून ते ६० वर्ष वयोगटातील कलाकारांचा सहभाग

  • बे एरियातील ज्येष्ठ गायिका अनुपमा चंद्रात्रेय यांच्या आवाजातील सुमधुर संतवाणी आणि त्यावर प्रतिमा शहा यांचे भरतनाट्यम नृत्य

  • प्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरू कीर्ती भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऋचा भिसे, सौम्या मुटाटकर, दिव्या विलेकर आणि सानिया पटवर्धन यांचे कथक

वारीतील खास आकर्षणे असलेले रिंगण, सर्वत्र घुमणारा विठ्ठल रखुमाईचा गजर अशी विठ्ठलभक्तीची एक परिपूर्ण ‘अनुभूती इंद्रायणी काठी’ या कार्यक्रमाद्वारे सर्वांना मिळणार आहे. पंढरपुरातील विठ्ठल भक्तीची स्पंदने बे एरियात या विशेष कार्यक्रमातून निश्चित जाणवतील.

- मानसी पिंपळसकर, स्वयंसेवक, इंद्रायणी काठी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com