कॉल डिटेल्सवरून खुनाचा छडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

ऑर्थोपेडिक डॉक्‍टरचा मायलेकीने मिळून क्रूरपणे खून केला. मृतदेहाचे आठ तुकडे करून बॅगेत भरून ते लोणावळ्यात आणि कात्रजच्या घाटात फेकून दिले. कॉल डिटेल्स आणि रेखाचित्रावरून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.

पुण्यातील प्रभात रस्ता येथील डॉ. दीपक महाजन. ते वायसीएम हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक डॉक्‍टर होते. त्यांचे जुलै २००६ मध्ये अपहरण करून २५ लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. 

लीना देवस्थळी आणि तिची मुलगी दीप्ती देवस्थळी. दीप्ती ही एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होती. या दोघींनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून खून करण्याचा कट रचला. महाजन यांना नोकरीच्या बहाण्याने सदाशिव पेठेतील एका लॉजमध्ये बोलावले. तेथे जबरदस्तीने त्यांना भुलीचे इंजेक्‍शन दिले. डोस जास्त झाला आणि त्यात डॉक्‍टरचा मृत्यू झाला. 

पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी तो मृतदेह कारमधून उत्तमनगर येथील खोलीत नेला. तिथे मृतदेहाचे आठ तुकडे करून बॅगेत भरले. त्यापैकी काही लोणावळ्यात आणि काही कात्रजच्या डोंगरात फेकून दिले. यानंतर त्या कारने दहीसरच्या घरी गेल्या. खासगी ट्रॅव्हल्सने त्या पुण्यात परतल्या आणि महाजन यांची पत्नी स्मिता यांच्याकडे फोनवरून पैशांची मागणी केली. स्मिता यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांशी संपर्क साधला. तत्कालीन पोलिस उपायुक्‍त चंद्रशेखर दैठणकर आणि सहायक आयुक्‍त संजय जाधव यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखेतील युनिट एकचे पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, युनिट तीनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र जोशी आणि खंडणी विरोधी पथकाचे बाळासाहेब आगाशे यांनी संयुक्‍त टीम तयार केल्या. या टीमने कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढले. त्यात नाशिक येथील देवस्थळी हे नाव समोर आले.

कॉल डिटेल्सनुसार देवस्थळीने दहीसर येथून ट्रॅव्हल्समधून परत येताना बाजूच्या सीटवरील प्रवाशाच्या मोबाईलवरून कॉल केला होता. पोलिसांनी त्या मोबाईलचे डिटेल्स काढून त्या प्रवाशाला गाठले. पोलिसांनी पाकशास्त्र पुस्तकावरील देवस्थळीचे छायाचित्र दाखवले. त्यावर त्या प्रवाशाने हीच ती महिला असल्याचे सांगितले. सी. गॅरी यांनी वायसीएम हॉस्पिटलमधील दोन डॉक्‍टर आणि लॉजच्या व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीवरून दीप्ती देवस्थळी हिचे हुबेहूब रेखाचित्रे काढले. 

पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी पुन्हा पिंपरीतून एका तरुणाला ताब्यात घेतले. तो बर्ड डिटेक्‍टिव्ह एजन्सी चालवीत होता. त्या तरुणाने पोलिसांना त्यांचे घर दाखवले. पोलिसांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. त्या वेळी या दोघी मायलेकी घरात होत्या. त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. दीप्ती ही घरात ससा पाळत होती. पोलिसांनी त्या सशाला मारून टाकू असे म्हणताच तिने खुनाची कबुली दिली. गुन्ह्याचा तपास डेक्‍कनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडे सोपवला. पुढे त्या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आरोपींनी हायकोर्टात धाव घेतली. त्यावर हायकोर्टाने हा खटला पुन्हा सत्र न्यायालयात चालविण्यास सांगितले. पुन्हा सुनावणी होऊन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा खून पैशाच्या कारणावरून केल्याचे सांगितले जाते. मात्र, खुनाचे नेमके कारण हे अद्याप गूढच आहे.

Web Title: Call details from the murder investigation