सातवाहनकालीन या घाटाच्या संवर्धनासाठी सरसावली तरुणाई 

धोंडिबा कुंभार
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

मुळशी तालुक्‍यातून कोकणात उतरणाऱ्या सातवाहनकालीन सावळ्या घाटाची संवर्धन मोहीम "श्री शिवदुर्ग संवर्धन' या संस्थेने हाती घेतली आहे. त्यासाठी पर्यावरण, इतिहास व दुर्गप्रेमींकडून रविवारी (ता. 17) श्रमदानाचे आयोजन केले आहे. 
 

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्‍यातून कोकणात उतरणाऱ्या सातवाहनकालीन सावळ्या घाटाची संवर्धन मोहीम "श्री शिवदुर्ग संवर्धन' या संस्थेने हाती घेतली आहे. त्यासाठी पर्यावरण, इतिहास व दुर्गप्रेमींकडून रविवारी (ता. 17) श्रमदानाचे आयोजन केले आहे. 

मुळशी तालुक्‍यातील पिंपरी पॉइंट या पर्यटनस्थळालगत असलेल्या या सावळ्या घाटाचा जीर्णोद्धार करून त्याचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पिंपरी गावाजवळ कुंडलिका दरीमधून कोकणात जाण्यासाठी प्राचीन असा सातवाहनकालीन सावळ्या घाट आहे. काळाच्या ओघात या घाटरस्त्याची पडझड झाली असून, वाट व वाटेवरील विविध पाण्याच्या दगडी टाक्‍या मातीने बुजल्या आहेत. हा घाट विस्मृतीत जाऊ नये व घाटाचे संवर्धन व्हावे, या हेतूने पुण्यातील श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने घाटाची संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. 

या मोहिमेबद्दल आकाश मारणे यांनी माहिती दिली की, रविवारी सकाळी सहा वाजता घोटावडे फाटा येथून या मोहिमेला सुरुवात होणार असून, सकाळी आठ वाजता पिंपरी गावाजवळील परातेवस्ती येथे सर्वजण पोचतील आणि प्रत्यक्षात मोहिमेला सुरुवात केली जाईल. कामे पूर्ण झाल्यानंतर या घाटाबद्दल विस्तृत माहिती व ताम्हिणी घाटातील पर्यावरणविषयक माहिती सांगितली जाणार आहे. 

या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी फूल बाह्याचा शर्ट, फूल पॅंट व कॅप परिधान करणे अनिवार्य आहे. पायात शूज घालणेही अनिवार्य आहे. येताना सोबत जेवणाचा डबा, पाणी आणावे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत 90752 37745 (आकाश मारणे) व 90110 19392 (संतोष गोलांडे) या क्रमांकांवर नावनोंदणी करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A campaign to clean the SAVALYA Ghat road