'कर्करुग्णांची उपचारात सकारात्मकता हवी'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

‘‘कर्करोग म्हणजे मृत्यू हे समीकरण आता राहिलेले नाही. अचूक निदान करणाऱ्या अद्ययावत वैद्यकीय चाचण्या, उपचाराचे आधुनिक तंत्र आणि प्रभावी औषधे या त्रिसूत्रीच्या आधारावर बहुतांश कर्करोग पूर्ण बरे होऊ शकतात,’’ असा विश्‍वास  कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनंतभूषण रानडे यांनी गुरुवारी येथे व्यक्‍त केला. ‘‘कर्करोगाच्या उपचाराची सुरवात नकारात्मकतेने न करता उपचारात रुग्ण आणि नातेवाइकांनी सकारात्मकता ठेवावी,’’ असा सल्लाही त्यांनी दिला. 

पुणे - ‘‘कर्करोग म्हणजे मृत्यू हे समीकरण आता राहिलेले नाही. अचूक निदान करणाऱ्या अद्ययावत वैद्यकीय चाचण्या, उपचाराचे आधुनिक तंत्र आणि प्रभावी औषधे या त्रिसूत्रीच्या आधारावर बहुतांश कर्करोग पूर्ण बरे होऊ शकतात,’’ असा विश्‍वास  कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनंतभूषण रानडे यांनी गुरुवारी येथे व्यक्‍त केला. ‘‘कर्करोगाच्या उपचाराची सुरवात नकारात्मकतेने न करता उपचारात रुग्ण आणि नातेवाइकांनी सकारात्मकता ठेवावी,’’ असा सल्लाही त्यांनी दिला. 

‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे वेस्टएंड’ आणि ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ यांच्यातर्फे आयोजित ‘आयुष्यमान भव’ या मालिकेतील दुसऱ्या भागात डॉ. रानडे यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी त्यांची मुलाखत  घेतली. 

डॉ. रानडे म्हणाले, ‘‘कर्करोगाबद्दल शास्त्रीय माहिती खूप कमी लोकांना आहे. त्यामुळे त्याची भीती, त्याच्याबद्दलचे गैरसमज हे जास्त होतात. त्यातून कर्करोगाचे निदान झाले, की रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. पण, लवकर निदान केल्याने कर्करोग पूर्ण बरा होतो. हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्‍यक आहे.’’

शैलेश नांदूरकर यांनी स्वागत केले. रोटरीचे नितीन वाशिकर यांनी प्रास्ताविक केले. आदित्य देवधर यांनी आभार मानले. आनंद भागवतवार यांनी सूत्रसंचालन केले.

जनुकांमध्ये झालेल्या बदलांमध्ये कर्करोग होतात. मात्र, काही कारणांकडे अजिबात दुर्लक्ष करून चालत नाही, त्यापैकी सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे तंबाखू.
- डॉ. अनंतभूषण रानडे,  कर्करोग तज्ज्ञ

हे लक्षात ठेवा
  देशातील आकडेवारीनुसार १०० पैकी ५० रुग्ण बरे होतात
  परत-परत उद्‌भवणे हे कर्करोगाचे मूळ लक्षण
  कर्करोगाने मृत्यू न येणे म्हणजे तो पूर्ण बरा होणे 
  जगात दरवर्षी कर्करोगाचे १४ लाख नवीन रुग्ण आढळतात
  भारतात तंबाखूशी संबंधित तोंड आणि मानेच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक (२९ टक्के)
  भारतात पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या कर्करोगाचे 
  स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त दिसते
  प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या कर्करोग वाढतोय

कर्करोगाची लक्षणे कोणती?
  सतत डोके दुखणे    एखादी गाठ नव्याने येणे
  सततचा रक्तस्राव   बरा न होणारा खोकला
  गिळायला, शौचाला त्रास होणे

लवकर निदानासाठी...
  डॉक्‍टरांचे प्रशिक्षण आवश्‍यक   अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान
  लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

उपचार काय आहेत?
  शस्त्रक्रिया   रेडिएशन
  किमोथेरपी   टार्गेटेड थेरपी
  जनुकांद्वारे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer patients need positive treatment