डोक्याच्या स्नायूचा केला जबडा; पुण्यातील डॉक्टरांना यश

तंबाखू, गुटख्यामुळे देशात तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात.
Doctor
Doctorsakal
Summary

तंबाखू, गुटख्यामुळे देशात तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात.

पुणे - महाविद्यालयात असल्यापासूनच संग्राम (नाव बदलले आहे) गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी गेला. त्याला वयाच्या ३५ व्या वर्षी तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्या वेळी त्याचा उजव्या बाजूचा जबडा शस्त्रक्रिया करून काढण्यात आला. आता परत कर्करोगाने डोके वर काढले. त्यामुळे पुन्हा जबडा काढावा लागला. अशा वेळी डोक्याच्या स्नायूपासून जबडा तयार करण्याची आव्हानात्मक शस्त्रक्रिया पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी केली.

तंबाखू, गुटख्यामुळे देशात तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात. त्यापैकी एक संग्राम! त्याला सहा महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करावी लागली होती. रेडिओथेरपी देखील झाली होती. या शस्त्रक्रियेत त्याचा उजवा जबडा काढण्यात आला. मात्र, काही दिवसांमध्ये परत कर्करोगाने डोके वर काढले. त्या संसर्गाचे गांभीर्य वाढले होते. त्यामुळे परत दुसरी शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मेंदूच्या खालच्या भागापर्यंत कर्करोगाचा संसर्ग गेला असल्याने शस्त्रक्रियेतील गुंतागुंत वाढली होती. ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉ. आशुतोष पाटील आणि डॉ. सत्यजित दंडगी यांनी केली. भूलतज्ज्ञ डॉ. सेजल खंडेलवाल, डॉ. रीमा, डॉ. अमोल, परिचारिका अर्चना खुटवड सहभागी झाले होते. इनामदार रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. परवेझ इनामदार यांचे यात सहकार्य मिळाले.

कोणताही कर्करोग समूळ काढणे हेच मोठे आव्हान असते. त्यात या रुग्णाचा कर्करोग मेंदूच्या जवळ होता. त्यामुळे त्यातील आव्हान आणखी वाढले होते. गळ्यापासून मेंदूपर्यंत जाणाऱ्या शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये कर्करोगाची गाठ होती. रुग्णाच्या वरच्या जबड्याची शस्त्रक्रिया हेच मोठे आव्हान असते. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या आणि संवेदनांचे वहन करणाऱ्या शिरा या भागात असतात.

- डॉ. आशुतोष पाटील

रुग्णांमध्ये आत्मविश्वास महत्त्वाचा

कर्करोगाच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करून प्राण वाचविण्याबरोबरच रुग्णाला समाजात सहजतेने मिसळता येईल, असा आत्मविश्वास देणे आवश्यक असते. त्यासाठी या रुग्णाचा चेहरा व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे होते. त्यामुळे रुग्णाच्या डोक्यावरील काही स्नायूंचा वापर करून जबडा तयार करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वैद्यकीय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

वैद्यकीय क्षेत्रात त्रिमितीय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येत आहे. त्यात डॉ. सत्यजित दडगी यांनी संशोधन केले आहे. त्याच आधारावर डोक्याच्या स्नायूंच्या माध्यमातून जबडा तयार करण्याची शस्त्रक्रिया केली. यापूर्वी देशातील मोठ्या शहरांमध्ये या प्रकारच्या आव्हानात्मक शस्त्रक्रिया होत होत्या. त्याच आता पुण्यातही होऊ लागल्याचा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com