आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी राज्यभरात गोंधळ; सरळसेवेची भरती पुन्हा वादात

Students_Exams
Students_Exams

पुणे : आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी रविवारी (ता.२८) राज्यभर घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. पुण्यात काही केंद्रांवर साधारणपणे अर्धातास परीक्षा उशिरा सुरू झाली. तर मराठवाडा, कोकण, विदर्भ या ठिकाणी एकाच बेंचवर दोन विद्यार्थी, प्रश्‍नपत्रिका फुटणे असे प्रकार घडल्याने पुन्हा एकदा सरळसेवेची भरती वादात सापडली आहे.

आरोग्य विभागातील लिपिक आणि इतर पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने निवडलेल्या एजन्सीच्या माध्यमातून परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी नमूद केलेल्या ठिकाणी ऐवजी दुसऱ्याच ठिकाणी केंद्र देण्यात आले. यामध्ये मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रात, तर पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आले. शिवाय प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज भरून देखील सर्व पदांची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.

रविवारी राज्यभरात परीक्षा होत असताना स्थानिक प्रशासन आणि एजन्सी यांच्यातील ढिसाळ कारभाराचा फटका उमेदवारांना बसला. औरंगाबादमध्ये फोनद्वारे उत्तर सांगणारे रॅकेट पकडण्यासह डमी उमेदवार बसविणे, परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग न ठेवता एका बेंचवर दोन उमेदवार बसविणे, बेंचवर परीक्षा क्रमांक नसणे असे प्रकार नाशिक, रत्नागिरी, नागपूर, नगर यासह इतर जिल्ह्यांमध्ये घडले आहेत. याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले असून, संतप्त झालेल्या उमेदवारांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.

एमपीएससी स्टुडंट राइट्सचे प्रतिनिधी महेश बडे म्हणाले, ‘‘आरोग्य विभागाची परीक्षा घेताना कोणतेही नियोजन नव्हते. ही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागात गोंधळ निर्माण झाला आहे. खासगी एजनसीद्वारे परीक्षा घेताना गोंधळ होतो म्हणूनच ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे दिली पाहिजे.’’

एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर म्हणाले, ‘‘पुण्यातील काही परीक्षा केंद्रांवर उशिरा पेपर दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत, पण नागपूर, औरंगाबाद, नाशिक येथे खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com