Vidhan Sabha 2019 : उमेदवारांकडून छत्र्यांचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

मतदानाच्या दिवशी जोरदार पाऊस होईल आणि मतदारराजा घराबाहेर पडणार नाही, या चिंतेने राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी खास मतदारांकरिता हजारो छत्र्या खरेदी केल्या होत्या.

विधानसभा 2019 
पुणे - मतदानाच्या दिवशी जोरदार पाऊस होईल आणि मतदारराजा घराबाहेर पडणार नाही, या चिंतेने राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी खास मतदारांकरिता हजारो छत्र्या खरेदी केल्या होत्या. कोथरूडमधील उमेदवारांनी सर्वाधिक छत्र्या रविवारीच खरेदी केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. एका पक्षाच्या उमेदवाराने १८ ते १९ हजार छत्र्यांची खरेदी केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने छत्र्या मतदान केंद्राबाहेरील बूथमध्ये पडून राहिल्याचे पाहायला मिळाले.

निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी संपल्यानंतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदानाची तयारी सुरू केली. 

मतदानासाठी अधिकाअधिक लोकांना घराबाहेर काढण्यासाठी रणनीती आखण्यात आली. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत होता. त्यात सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला आणि सोमवारी (ता. २१) पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. त्यामुळे मतदानासाठी लोक येतील का, अशी चिंता राजकीय पक्षांना होती. त्यावर उपाय म्हणून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी चारचाकी वाहनांचा ताफा तयार ठेवण्यात आला होता. त्यानंतर छत्र्यांची गरज भासणार असल्याने बाजारात त्याही खरेदी करण्यात आल्या. मात्र, एकाच वेळी इतक्‍या प्रमाणात छत्र्या उपलब्ध होण्याची शक्‍यता नसल्याने पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतूनही छत्र्या विकत आणण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मतदारांच्या सोयीसाठी काही भागांत छत्र्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ऐन वेळी पावसात मतदारांची गैरसोय होऊ नये, ही त्यामागची भूमिका होती. 
- दीपक पोटे, नगरसेवक, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates were buying thousands of umbrellas for voters