कॅंटोन्मेंटमधील रस्ते वाहतुकीस खुले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे/मुंढवा - पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड परिसरातील दोन रस्ते मंगळवारी कँटोन्मेंटच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतुकीसाठी खुले केले. घोरपडीतील इलाइट रस्त्यावरील दोन्ही लोखंडी दरवाजे उघडण्यात आले, तर वानवडीतील राइट फ्लॅंक रस्त्यावर बांधलेली भिंत जेसीबीने पाडण्यात आली. या दरम्यानच कामाचे श्रेय घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू होती.

पुणे/मुंढवा - पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड परिसरातील दोन रस्ते मंगळवारी कँटोन्मेंटच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतुकीसाठी खुले केले. घोरपडीतील इलाइट रस्त्यावरील दोन्ही लोखंडी दरवाजे उघडण्यात आले, तर वानवडीतील राइट फ्लॅंक रस्त्यावर बांधलेली भिंत जेसीबीने पाडण्यात आली. या दरम्यानच कामाचे श्रेय घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू होती.

लष्कराने बंद केलेले रस्ते सरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आदेशानुसार खुले होणार असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. कॅंटोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास राइट फ्लॅंक रस्त्यावरील भिंत पाडली. परिसरातील नागरिक, कॅंटोन्मेंटचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर घोरपडीहून नॉर्थ मेन रोडला जोडणारा इलाइट रस्ता लोखंडी दरवाजे उघडून खुला करण्यात आला.

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रियांका श्रीगिरी, सदस्य विनोद मथुरावाला, अभियंता सुखदेव पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक सीमा चुटके, उज्ज्वला छिद्रावार, शशीधर पुरम, नीलेश पाटोळे, मोइन कुरेशी आदी या वेळी उपस्थित होते. दोन्ही रस्ते खुले झाल्याने स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

घोरपडीहून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुमारे सात किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. तसेच प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याला जाण्यासाठी लोकांना चार किलोमीटर वळसा घालावा लागत होता. आता दोन्ही रस्ते खुले झाल्याने प्रवासाचे अंतर कमी होऊन वेळही वाचणार असल्याचे  नागरिकांनी सांगितले.

नगरसेवकांमध्ये रंगला श्रेयवाद 
घोरपडी - इलाइट रस्ता खुला करण्यावरून भाजपच्या नगरसेवकांमध्ये श्रेयवाद रंगला. त्यातूनच हा रस्ता तीन वेळा खुला करण्यात आला. तर एका नगरसेवकाने रस्ता खुला करण्यासाठी उपस्थित न राहता सोशल मीडियावर हा रस्ता माझ्या प्रयत्नामुळे खुला झाल्याचा दावा केला. तसेच काही तासांनंतर तोच रस्ता पेढे वाटून तिसऱ्यांदा खुला करण्यात आला. सकाळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रियांका श्रीगिरी आणि काँग्रेसचे बोर्ड सदस्य विनोद मथुरावाला यांनी घाईघाईने रस्ता खुला केला. त्यानंतर नगरसेविका लता धायरकर या काही वेळानंतर तेथे आल्या. त्यांनादेखील श्रेय मिळावे म्हणून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पुन्हा दगड ठेवले. हे दगड उचलून धायरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्ता पुन्हा खुला केला.

Web Title: cantonment road transport