पाच जणांसहीत कार पडली कालव्यात अन्...

राजेंद्र सांडभोर
Sunday, 13 September 2020

-चासकमान कालव्यात पडलेल्या मोटारीतील पाच जणांचे प्राण सातकरस्थळातील तरुणांनी वाचविले.

राजगुरूनगर : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा शब्दशः अनुभव येथील एका शिक्षक कुटुंबाला आज आला. जीवघेण्या प्रसंगातून तीन मुलांसह, पाच जणांचे प्राण वाचले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खेड तालुक्यातील सातकरस्थळ (पूर्व) येथील चासकमान धरणाच्या वाहत्या डाव्या कालव्यात एक मोटार पडली आणि मोटारीतील पाचही जण बुडण्याच्या बेतात होते. मात्र मदतीला धावलेल्या धाडसी युवकांमुळे सर्वजण सुखरूप बाहेर पडल्याची घटना आज दुपारी घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, येथील प्राथमिक शिक्षक गणेश मगर आपल्या मारुती मोटारीमधून, पेठ गावाजवळील सौरंग्या डोंगरावरील दत्त मंदिरात, बुटेवाडी-काळेवाडी मार्गे गेले होते.

त्यांच्याबरोबर पत्नी, त्यांची एक आणि शेजारच्या दोन अशा तीन लहान मुली मोटारीत बसलेल्या होत्या. ते देवदर्शन करून परत येत होते आणि त्यांची पत्नी गाडी चालवत होती. सातकरस्थळ येथील चासकमान डाव्या कालव्याच्या पुलाजवळून वळण घेताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट कालव्याच्या पाण्यात जाऊन पडली. सुदैवाने गाडीच्या काचा उघड्या होत्या आणि गाडी पाण्यावर तरंगू लागली.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

दरम्यान, हे दृश्य कविता सातकर आणि साधना सातकर यांनी पाहिले. त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केला. ती ऐकून जवळच असलेल्या सुनील सातकर, गणेश सातकर, अशोक सातकर, संदीप सातकर, तुषार सातकर, विशाल सातकर, मयूर सातकर आदींनी कालव्यात उड्या मारल्या.

या युवकांनी गाडीचे दरवाजे बाहेरून उघडले. मुलांना व महिलेला बाहेर काढले. तत्पूर्वी मगर यांनी स्वतःच बाहेर उडी मारली होती. त्याठिकाणी पाण्याचा प्रवाह संथ आणि उथळ असल्याने गाडीही धरून ठेवली. त्यामुळे जीवावरचा प्रसंग बेतला असतानाही पाचही जण सुखरूप राहिले. नंतर क्रेनच्या साहाय्याने पाण्यातील मोटार काढण्यात आली. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The car crashed into the canal water