मंचर परिसरातील विद्यार्थ्यांना करिअर टिप्स

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 23 जून 2018

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उपयुक्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या वाटा निवडण्यासाठी मदत होते. यापुढेही अशा पद्धतीचे उपक्रम दर वर्षी राबविण्याची गरज आहे.
- अक्षय आढळराव पाटील

मोठ्या संख्येने उपस्थिती; तज्ज्ञांचे मार्गदर्शन

मंचर (पुणे) : येथील शिवगिरी मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. 22) "सकाळ' मीडिया प्रा. लि. व लांडेवाडी येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यातर्फे दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन डायनालॉग कंपनीचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाबासाहेब आढळराव पाटील, रवींद्र करंजखेले, अरुण गिरे, सुनील बाणखेले, सागर काजळे, योगेश बाणखेले, देविदास दरेकर, सचिन बांगर, श्‍यामल चौधरी, सुरेश डोके, प्रा. शबनम मोमीन उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. परिसरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करिअर मार्गदर्शक तज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी शासकीय नोकऱ्या व विविध कंपन्यांमध्ये आयटीआय, संगणक, अभियांत्रिकी, परिचारिका, औषध उत्पादक कंपन्यांमध्ये असणाऱ्या संधींची माहिती दिली. "सकाळ'चे सहायक वितरण व्यवस्थापक दीपक महाडिक, शशिकांत जगताप, नीलेश देशमुख यांनी व्यवस्था पाहिली. सूत्रसंचालन राजू आढळराव यांनी केले.

दरवर्षी 'सकाळ'सोबत करिअर मेळावा
मंचर व संपूर्ण आंबेगाव तालुक्‍यातील पालक व विद्यार्थी यांच्या अभूतपूर्व प्रतिसादाची दखल खासदार शिवाजीराव आढळराव यांनी अमेरिकेतून घेतली. यापुढे मंचरमध्ये प्रत्येक वर्षी "सकाळ'सोबत करिअर मेळाव्याची घोषणा त्यांनी केल्याची माहिती भैरवनाथ शिक्षण मंडळ संस्थेच्या प्रशासन अधिकारी प्रा. श्‍यामल चौधरी यांनी दिली.

कमी टक्केवारी मिळाली तरी विद्यार्थ्यांनी नाराज होऊ नये. योग्य वेळ आल्यानंतर करिअर मार्गदर्शन जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते.
- वंदन नगरकर, व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ

Web Title: Career tips for students in Manchar area