सावधान... बिबट्या जवळ येत आहे

Leopard
Leopard

जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्‍यात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्यांचे वास्तव्य असल्याने वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अनेक बिबटे पकडले जाऊनही त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बिबट्याचे स्वतःचे एक कार्यक्षेत्र असल्याचे सांगण्यात येते. एक बिबट्या पकडला की त्याची जागा दुसरा बिबट्या घेतो. मुबलक खाद्य, पाणी आणि लपण असलेल्या विशेषतः ऊस शेतीच्या परिसरात त्याचे वास्तव्य आहे.

बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज सामावून घेतो. गावाजवळ अस्वच्छता असल्यास गावाजवळ वावरणारी डुकरे, कुत्रे यांच्या रूपाने सहज खाद्य उपलब्ध होत असल्याने बिबट्याचा मानवी वस्त्यांजवळ वावर वाढला आहे. भक्षाचा पाठलाग करत तो मानवी वस्तीत अथवा घरात शिरल्याचीही उदाहरणे आहेत. 

गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यातील नागरिक विशेषतः शेतकरी वर्ग, बिबट्या व मानव सहजीवन समजून घेऊनच (बिबट्याचा अधिवास मान्य करून) राहत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, बिबट्यांची संख्या व त्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. आता भरदिवसाही नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी कोळवाडी (ता. जुन्नर) येथील दिघेवस्ती अंगणवाडीच्या पाठीमागील बाजूच्या भिंतीजवळून उसाच्या शेतात बिबट्या जाताना अंगणवाडीच्या मदतनीस सारिका सहाणे यांनी प्रत्यक्ष पाहिला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वाड्यावस्त्यांवर लहान मुलांच्या शाळा, अंगणवाड्या असल्याने लहान मुलांनाही बिबट्याचा धोका आहे.

बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने उपाययोजनेचा भाग म्हणून ‘बिबट्या सफारी पार्क’च्या रूपाने बिबट्यांसाठी स्वतंत्र अधिवास निर्माण करणे, वाढती संख्या कमी करण्यासाठी बिबट्यांची नसबंदी करणे, तसेच बिबट्यांना पिंजऱ्यात पकडण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवून बिबट्यांना दूरवरच्या जंगलांत नेऊन सोडणे यासारख्या विविध उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे.

गेल्या सुमारे तीन-साडेतीन वर्षांपूर्वीची (फेब्रुवारी २०१६) ही घटना आहे. बेल्हे (ता. जुन्नर) येथे तेव्हा दुपारच्या वेळी मी शेतात जनावरांसाठी चारा (लसूणघास) कापत होते, तर शेळी माझ्या पाठीमागे काही अंतरावर मोकळी चरत होती. तेव्हा माझ्यासमोर काही अंतरावर लहान बांधाआड बिबट्या दबा धरून बसलेला असल्याची मला पुसटशी कल्पनाही नव्हती. समोर बिबट्या दिसल्यावर मी उठून जोरात ओरडत बाजूला पळण्यास व बिबट्याने झेप घेण्यास एकच वेळ झाली. मात्र, बिबट्याची उडी थेट शेळीजवळ पडल्याने, त्याने झडप घालून शेळीची मान तोंडात पकडून उचलून घेऊन पळण्यास सुरुवात केली. माझ्या ओरडण्याच्या आवाजाने धावून आलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी बिबट्यावर मोठमोठे दगड भिरकावल्याने तो शेळीला तेथेच टाकून पळाला, पण तोपर्यंत शेळी गतप्राण झाली होती. मात्र, आता गेल्या तीन-साडेतीन वर्षांपूर्वीची ही घटना नुसती आठवली तरीही अंगाचा थरकाप उडतो.
- सीमा राकेश शिंदे, बेल्हे, ता. जुन्नर

संरक्षणासाठी अशी घ्या काळजी
माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिलेल्या टिप्स....

शेतात काम करण्यासाठी जाताना हातात घुंगुरकाठी तसेच टॉर्च ठेवा. 
शक्‍यतो मोठमोठ्याने बोला, तसेच रेडिओ अथवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावा. 
उन्हाळ्यात उघड्यावर अंगणात झोपू नये. उघड्यावर शौचास जाऊ नये
घराला सभोवती कुंपण घाला तसेच परिसर स्वच्छ ठेवा. घराबाहेरील दिवे रात्रीच्या वेळी सुरू ठेवा. 
लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका. लहान मुलांनी शाळेत समूहाने जावे. 
बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नका. आपल्यापेक्षा उंच असणाऱ्या प्राण्यांवर बिबट्या सहजासहजी हल्ला करीत नाही.
मेंढपाळ व ऊसतोडणी कामगारांनी बिबट्यापासून संरक्षणासाठी विशेष काळजी घेणे आवश्‍यक

बिबट्यांचे मागील पाच वर्षांतील हल्ले
मृत व्यक्ती ९
जखमी व्यक्ती १७
जखमी व मृतप्राणी ५ हजार ४१५

सहजीवन समजून घेणे आवश्‍यक
मनुष्याला जंगल व शेती यांतील फरक माहीत असला तरी वन्य प्राण्यांना तो माहीत नसतो. यामुळे बिबट्या-मानव सहजीवन समजून घेऊन त्याप्रमाणे वाटचाल करण्याची गरज आहे. बिबट्यांची संख्या वाढत असली तरी ती नैसर्गिक बाब आहे. यामुळे माणसांनी बिबट्यांपासून संरक्षणासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत वनविभागाच्या वतीने माहितीफलक, भित्तिपत्रके, व्याख्याने आदींच्या माध्यमातून जनजागृतीही केली जाते. ऊसतोडणी कामगार उघड्यावर तात्पुरता निवारा करून राहतात, त्याऐवजी त्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करावी, यासाठी वनविभागाच्या वतीने साखर कारखान्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

शेतीसाठी दिवसभर थ्रीफेज वीजपुरवठा सुरू राहिल्यास, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जाण्याची गरज भासणार नाही. आपल्या पिलांच्या सुरक्षिततेसाठी जशी एखादी कुत्री जवळून जाणाऱ्या माणसांच्या अंगावर धावून जाते, त्याचप्रमाणे आपल्या बछड्यांच्या संरक्षणासाठी बिबट्याच्या मादीने जवळून जाणाऱ्या दुचाकीवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. ऊसतोडणी करताना बिबट्याचे बछडे आढळल्यास त्यांना हाताळू नये, याबाबत तातडीने वनविभागाला कळवणे गरजेचे आहे. बिबट्यापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतल्यास, बिबट्याचा वावर हे संकट वाटणार नाही, असे ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com