सव्वा कोटी पुन्हा बॅंक खात्यात 

purees
purees

पिंपरी : बॅंकेतून बोलत असल्याचे सांगत बॅंक खाते व एटीएम कार्डची माहिती घेऊन परस्पर रक्कम काढून घेणे, बनावट मेल आयडीवरून संपर्क साधून पैसे जमा करण्यास भाग पाडणे अशा ऑनलाईद्वारे फसवणूक झाल्याबाबत पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या सायबर सेलकडे गेल्या दहा महिन्यांत प्राप्त झालेल्या तक्रारदारांना सायबर सेलने तब्बल सव्वा कोटीची रक्कम पुन्हा मिळवून दिली आहे. 

फेक कॉल, ई-मेलआयडीवरून संपर्क साधून बॅंक खात्यातील रक्कम काढण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत सायबर सेलकडे तक्रार आल्यास तातडीने संबंधित बॅंकेशी पत्रव्यवहार करून पेमेंट थांबविण्यासह बॅंकेला सूचना देऊन तक्रारदाराच्या खात्यातून गेलेली रक्कम पुन्हा त्यांना मिळवून देण्यात आली. एक जानेवारी ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत 110 अर्जदारांना त्यांची एक कोटी 17 लाख 35 हजार रुपयांची रक्‍कम पुन्हा त्यांच्या बॅंक खात्यात मिळवून देण्यास सायबर सेलला यश आले आहे. 

अशी होते फसवणूक 
- सध्या अनेक गुन्ह्यांमध्ये मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासात मोबाईल ट्रेकिंग, कॉल रेकॉर्डिंग महत्त्वाचे ठरतात. गुंतागुंतीचे तांत्रिक गुन्हे उघडकीस आणण्यात मोबाईल महत्त्वाचा घटक ठरतो. 
- सध्या अनेक व्यवहारांमध्ये बिल देण्यासाठी वेगवेगळ्या ऍपचा वापर केला जातो. अनेकदा ऑनलाइन पेमेंटमध्ये फसवणूक केली जाते. ती उघडकीस आल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली जाते. 
- फेक कॉलद्वारे फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहे. बॅंकेतून बोलत असल्याचे खोटे सांगून सर्व माहिती घेतली जाते. त्यानंतर काही क्षणातच संबंधित व्यक्तीच्या बॅंक खात्यातील रक्कम गायब केली जाते. 


सायबर सेलकडे एक जानेवारी ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत दोन हजार 648 तक्रार अर्ज आले. त्यातील सुमारे सोळाशे अर्ज साध्या तर उर्वरित अर्ज मोठी फसवणूक, गोपनीय माहितीचा गैरवापर, बदनामी अशा स्वरूपाचे होते. या अर्जांची चौकशी करून तपास केला. यातून 14 गुन्हे उघडकीस आणण्यासह 18 आरोपींना अटक केली. त्यात 110 अर्जदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यात सायबर सेलला यश आले. 

न्यूयॉर्क बॅंकेतील पैसे मिळाला परत 
चिंचवड येथील मित्तल प्रिसिजन प्रेशर डाय कास्टिंग एलएलपी कंपनीने चिनी कंपनीकडून खरेदी केलेल्या मालाचे बिल देण्यासाठी चिनी कंपनीने त्यांच्या बॅंक डिटेल्स दिल्या. परंतु, काही दिवसांनी फेक मेलवरून चिनी कंपनी त्यांचे बॅंक खाते बदलत असल्याचा मेल आला व त्यावर यूकेतील एका बॅंकेचा खाते क्रमांक देऊन त्यावर 44 लाख 79 हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, ही रक्कम चिनी कंपनीला मिळालीच नाही. यातून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर सेलने यूकेतील बॅंकेशी पत्रव्यवहार केला. पैशांचा व्यवहार थांबविण्याबाबत कळवून ही रक्कम चिंचवडमधील कंपनीला मिळवून दिली. 
यासह चिंचवड येथील लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल या कंपनीचीही फसवणूक झाली. ही कंपनी न्यूयॉर्क येथील कंपनीकडून कच्चा माल खरेदी करीत होती. कंपनीला मेल आयडी बदलल्याचे सांगण्यात आले. या मेलआयडीवरून आलेल्या बॅंक खात्यावर पाच लाख 93 हजार रुपये ट्रान्स्फर केले. मात्र, ती रक्कम न्यूयॉर्क येथील कंपनीला पोचलीच नाही. याबाबत सायबर सेलकडे तक्रार आल्यानंतर सायबर सेलने न्यूयॉर्क येथील बॅंकेशी पत्रव्यवहार करून या रकमेचा व्यवहार थांबविण्याबाबत कळविले. तसेच ही रक्कम कंपनीच्या बॅंक खात्यावर मिळवून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com