वाहनमालकांचा आरटीओला गंडा ; 19 जणांविरुद्ध फिर्याद दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

बनावट योग्यता प्रमाणपत्र व पैसे भरल्याच्या पावत्या प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करून 36 वाहनमालकांनी परिवहन विभागाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : बनावट योग्यता प्रमाणपत्र व पैसे भरल्याच्या पावत्या प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करून 36 वाहनमालकांनी परिवहन विभागाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 19 जणांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार एजंटांनी केला असल्याची शक्‍यता आहे. 

संजय गायकवाड यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात शिरूर येथील प्रकाश कोरुगेटेड प्रा. लि. या कंपनीसह 19 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक संदीप जमदाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. संगम पुलाजवळील परिवहन कार्यालयाकडे 36 वाहनमालकांनी त्यांच्या मालकीच्या वाहनांचे नूतनीकरण केलेले बनावट योग्यता प्रमाणपत्र व बनावट मॅन्युअल पासिंग फी भरल्याच्या पावत्या जमा केल्या.

त्याद्वारे संगणक प्रणालीवर माहिती अद्ययावत केली. दरम्यान, संगणकावर ही माहिती जमा करत असताना त्यामध्ये गोंधळ असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. डिसेंबर 2017 ते एप्रिल 2018 पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचेही पाहणीत आढळून आले. 

जमदाडे म्हणाले, ""मालवाहू गाड्या, बस व ट्रकसाठी जालना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून योग्यता प्रमाणपत्र व पैसे भरल्याच्या पावत्या पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे जमा केल्या. मात्र, तपासणी करताना ही कागदपत्रे व पावत्या बनावट असल्याचे उघडकीस आले आहे.'' 
 

Web Title: Carrying malpractices in RTOs FIR against 19 peoples