मुलाच्या मृत्यूप्रकरणी पालिका अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - विजेच्या खांबांमध्ये वीजप्रवाह उतरल्याने बारावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिकेच्या विद्युत अभियंत्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 ऑगस्ट रोजी वारजे-माळवाडी येथे घडली होती. 

पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय 12, रा. वारजे माळवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. पृथ्वीराज हा 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-बंगळूर महामार्गावरील जॉगिंग ट्रॅकमध्ये सायकल खेळण्यासाठी गेला होता. मात्र, तेथे जवळच असलेल्या विजेच्या खांबाला त्याने सायकल लावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने पृथ्वीराजला विजेचा धक्का बसला. त्यामध्ये तो मृत्युमुखी पडला. 

याप्रकरणी वारजे पोलिसांनी महावितरण कंपनीच्या विद्युत निरीक्षकांना अहवाल पाठविला होता. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा खांब पुणे महापालिकेचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी पुणे महापालिकेच्या विद्युत अभियंत्याच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात होऊन पृथ्वीराजला आपला जीव गमवावा लागला, असा निष्कर्ष काढून अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The case against the municipal engineer has been filed against the death of the child