जनावरे ‘मोकाट’; मालक ‘मुकाट’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

घडलेली घटना...
दापोडीतील एका नगरसेवकाची गाय खडकी रेंजहिल येथील गुरुद्वारासमोरील रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडली होती. स्थानिक कार्यकर्त्यांनी संबंधिताला फोनद्वारे कळविले. परंतु सोईस्करपणे दुर्लक्ष केले. मात्र, जखमी गायीला उठता येत नव्हते. अशातच भटकी कुत्री तिच्यावर हल्ला करीत असताना तेथून जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी कुत्र्यांच्या तावडीतून तिची सुटका केली. तिच्या डोळ्याला जखम झाली होती. गाईवर उपचार करण्यासाठी तरुणांनी खासगी व महापालिका प्राण्यांच्या डॉक्‍टरांना संपर्क केला. मात्र त्यांनी येण्यास असमर्थता दर्शवली.

पिंपरी - मोकाट गाई, बैल, म्हैशी आदींच्या उपद्रवामुळे पादचाऱ्यांनाच नव्हे, तर वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. शहरातील मालकांनी जनावरांना मोकाट सोडले आहे. अनेकांकडून जनावरांचे वय झाल्याची कारणे पुढे केली जात आहेत. महापालिकेच्या भोसरी-पांजरपोळ कोंडवाड्यात सोडलेल्या २५ जनावरांसाठी एकही मालक पुढे आला नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका मुंबई अधिनियमानुसार निवासी भागात विनापरवाना जनावरे पाळण्यास सक्त मनाई आले. परंतु खडकी, पिंपळे गुरव, ताथवडे, खराळवाडी, पिंपरीगाव, मोशी अशा अनेक भागात गायी, म्हशी, बैल पाळण्यात येतात. गाय दूध देत असल्याने तिची निगा राखली जाते. परंतु कालांतराने ही जनावरे वयस्कर झाल्यावर त्यांना मोकाट सोडली जातात. अशा जनावरांची संख्या खूप आहे. परंतु पशुवैद्यकीय विभागाच्या हाती केवळ २५ जनावरेच लागली आहेत. त्यापैकी पाच जनावरांवर मालकांनी हक्क दाखविला असला, तरी त्यांच्याकडून दंड वसूल केल्याशिवाय जनावरे सुपूर्त करता येत नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.

राज्य सरकारने महापालिका निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय 

प्लॅस्टिक ठरतेय कर्दनकाळ 
जनावरांचा कोणी वारस नसल्याने ती टाकाऊ कचरा, उकिरड्यावर टाकलेल्या खराब झालेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांतील अन्न खाऊन पोट भरतात. त्यामुळे या जनावरांचे आरोग्य धोक्‍यात येत असून, डम्पिंगवर प्लॅस्टिकचा कचरा जनावरांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. जनावरांच्या पोटात प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने पोटातील विशिष्ट भागात गोळा तयार होतो. त्यामुळे जनावरांची भूक मंदावून रोगाला निमंत्रण मिळते. मोकाट फिरत असलेल्या जनावरांचे मालक कोण? हे समजण्यापलीकडे असते. जनावरे बेवारस सोडली जातात. मात्र, अशा जनावरांना कोंडवाड्यात ठेवण्यात येते. संबंधित मालकाची माहिती झाल्यास अशा मालकांवर कठोर कारवाई करणेही गरजेचे आहे. अनेकदा अशी जनावरे बेघर झालेली असतात.

जनावरांची काळजी मालकांनी घेणे गरजेचे असते. त्यामुळे पाळीव जनावरांचे आरोग्य सुदृढ राहते. जर आपण आपल्या पाळीव जनावराला मोकाट सोडले, तर त्यांचे आरोग्य बाधित होऊन मृत्यूला निमंत्रण मिळते.
- विक्रम भोसले, पशुप्रेमी वाइल्ड वेल्फेअर असोसिएशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cattle issue in pimpri chinchwad