पुणे जिल्ह्यात लाडू- पेढे वाटून आनंदोत्सव साजरा 

manchar ram mandir
manchar ram mandir

पुणे : पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद साजरा करण्यात आला. कारसेवेत सहभागी झालेल्यांचा सन्मान करण्यात आला. मंदिरांमध्ये पूजा व इतर धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. गुढ्या उभारून आनंद साजरा करण्यात आला. लाडू व पेढ्यांचे ठिकठिकाणी वाटप करण्यात आले. 

नसरापूरला कारसेवेत सहभागी नागरिकांचा सन्मान 
नसरापूर :
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीच्या निमित्ताने नसरापूर येथील सुमारे दोनशे वर्षे पूर्वीच्या पंतसचिवकालीन श्रीराम मंदिरात युवकांनी सामाजिक अंतर ठेवत मंदिरात दीप प्रज्वलन, रांगोळी होमहवन करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अयोध्येत कारसेवेमध्ये सहभागी नागरिकांचा सन्मान करण्यात आला. 
नसरापूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना तसेच अग्निहोत्र सेवा मंडळाचे कार्यकर्त्यांनी या आनंदोत्सवाचे आयोजन केले होते. गावामधील सर्वांत जुन्या राम मंदिराची कार्यकर्त्यांनी स्वच्छता करून मंदिरात विधिवत पूजा केली. मंदिर सभागृहात भव्य रांगोळी काढण्यात आली होती. तसेच मंदिरात सर्वत्र दीप प्रज्वलन करण्यात आले होते.  

मंचरला 11 हजार लाडवांचे वाटप 
मंचर :
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्ष, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने श्रीराम व भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. बजरंग दलाच्या वतीने 11 हजार 111 बुंदीच्या लाडूचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. अनेक घरांसमोर रांगोळ्या काढून व गुढ्या उभारून आनंद साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे नेते संजय थोरात यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाबरोबरच उपस्थितांना लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे नेते जयसिंगराव एरंडे, तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, रवींद्र त्रिवेदी, कैलास राजगुरू, डॉ. दत्ता चासकर, संदीप बाणखेले उपस्थित होते. यावेळी कारसेवक शशिकांत खेडेकर यांचा सत्कार संजय थोरात व पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले यांच्या हस्ते करण्यात आला. पुरातन श्रीराम मंदिरात पूजा आरती दुर्गा वाहिनीच्या प्रांत संयोजिका ऍड. मृणालिनी पडवळ, ऍड. स्वप्ना पिंगळे, गणेश राऊत, अक्षय जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आली. 
 

पिरंगुट येथे भाजपतर्फे पूजा उत्सव 
पिरंगुट :
मुळशी तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने बुधवारी राम जन्मभूमी पूजा उत्सव साजरा करण्यात आला. पिरंगुट (ता. मुळशी) येथील तालुका भाजप युवा मोर्चाच्या कार्यालयाबाहेर प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांसमोर आकर्षक रांगोळी काढून दिवे प्रज्वलित करण्यात आले. प्रभू रामाची पंचारती करून त्यांना वंदन करण्यात आले. यावेळी लाडू व पेढ्यांचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी लखन गोळे, विकी निकटे, चेतन निकटे, केतन देशमुख तसेच रामभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तालुका भाजप युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी केले होते.

शिरूरला भाजपतर्फे लाडू वाटप 
शिरूर :
अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचे स्वप्न तब्बल साडेपाचशे वर्षांनी पूर्ण होत असल्याचा आनंद येथे विविध संघटनांनी साजरा केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी साडेपाचशे घरांमध्ये लाडू वाटले. शहरात श्रीराम मंदिरात महिलांनी सकाळी पूजाअर्चा केली. त्यानंतर मंदिराजवळ पोलिस बंदोबस्त होता. अयोध्येत भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बुंदीचे लाडू वाटले. भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मितेश गादिया, व्यापारी आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष बाबूराव पाचंगे, सोशल मिडीयाचे तालुकाध्यक्ष विजय नरके यांनी पुढाकार घेतला. मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे, मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील माळवे, जनहित कक्षाचे सुशांत कुटे व शहर अध्यक्ष रविराज लेंडे यांनी "जय श्रीराम'च्या घोषणा देत पेढे वाटले. श्री रामलिंग मंदिरातही दर्शनासाठी भाविक आले होते. 
 
श्रीराम प्रतिमेचे सासवडला पूजन 
गराडे :
सासवड (ता. पुरंदर) येथे भाजपतर्फे श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन तालुकाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष आर. एन. जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी साकेत जगताप, नीलेश जगताप, शेखर वढणे, गणेश भोसले, बाळासाहेब चव्हाण, श्रीकांत ताम्हाणे, श्रीकांत थिटे, नदीम इनामदार, अँड.विश्वास पानसे, विजय जगताप, विजय पुरंदरे, अंकुर शिवरकर, राहुल बुद्धिवंत उपस्थित होते. त्यानंतर सासवड बाजारपेठ, पोलिस स्टेशनमध्ये 50 किलो पेढ्यांचे वाटप करीत जल्लोष करण्यात आला. 

निमगाव म्हाळुंगीत फटाके फोडून आनंदोत्सव
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिरातील मूर्तींची आरती करून पूजन करण्यात आले. येथील शिवराज्य प्रतिष्ठाण व ग्रामस्थांतर्फे श्रीराम मूर्तीसह हनुमान, ग्रामदैवत श्री म्हसोबा व गावातील विविध देवदेवतांचे पूजन करण्यात आले. यावेळी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शंकरबापू लांडगे, सरपंच ज्योती शिर्के, पोलिस पाटील किरण काळे, अॅड. रावसाहेब करपे, शिवराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बापूसाहेब काळे, बबनराव रणदिवे, बबनराव काळे, दैनिक चौधरी, काळूराम चव्हाण, अॅड. गणेश शिर्के, सागर चव्हाण, आदित्य करपे, किरण थोरात, सुनील विधाटे, मारुती गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com